Rajan Salvi ACB Raid : शिवसेनेचे (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आमदार राजन साळवी यांच्या घरी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं आज छापे टाकले असून सकाळपासून झाडाझडती सुरू आहे. राजन साळवी यांनी राजकीय कारवाई असल्याचं सांगत अटक करून घेण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. कितीही धाडी टाका, अटक करा. उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार नाही, असा आवाज त्यांनी सत्ताधाऱ्यांना दिला आहे.
शिवसेनेत फूट पडल्यापासून उद्धव ठाकरे यांच्या सोबत असलेल्या आमदार, खासदारांच्या मागे तपास यंत्रणांचा ससेमिरा लागला आहे. नुकतीच युवा सेनेचे सचिव सूरज चव्हाण यांना मुंबईतील कथित खिचडी घोटाळ्यात अटक करण्यात आली आहे. त्यानंतर आज साळवी यांच्या घरी छापा टाकण्यात आला.
राजन साळवी यांच्यावर बेहिशेबी संपत्ती जमवल्याचा आरोप आहे. ऑक्टोबर २००९ ते २ डिसेंबर २०२२ या कालावधीत त्यांनी ३ कोटी ५३ लाखांची बेहिशेबी संपत्ती जमा केल्याचा आरोप आहे. या आरोपाखाली रत्नागिरी शहर पोलीस ठाणे साळवी यांच्यासह त्यांची पत्नी अनुजा आणि मुलगा शुभम यांच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याच संदर्भात कागदपत्रांची तपासणी करण्यासाठी आज एसीबीचे १७ अधिकारी साळवी यांचं मूळ घर, राहतं घर आणि हॉटेलमध्ये पोहोचले आहेत.
एसीबीची कारवाई सुरू असतानाही राजन साळवी हे निर्धास्त आहेत. 'मी कुठलीही चूक केलेली नाही. मी दोषी नाही. त्यामुळं मी अटकपूर्व जामिनासाठी अर्ज करणार नाही. पोलीस कोठडीत राहायची माझी तयारी आहे. मला न्यायालयात नेऊ द्या. माझा न्यायालयावर विश्वास आहे. तिथं माझी सुटका होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
‘मी शिंदे गटात जावं म्हणूनच हे सगळं सुरू आहे, पण मी दबावाला भीक घालत नाही. आमच्या निष्ठा बाळासाहेबांच्या चरणी आहेत. बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला कसली भीती? मी लेचापेचा शिवसैनिक नाही. परिणामांची पर्वा करत नाही,' असं राजन साळवी यांनी म्हटलं आहे.
राजन साळवी यांना याआधी तीन वेळा अलिबागच्या कार्यालयात चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. आज एसीबीचे अधिकारी येणार असल्याची माहिती त्यांना आधीच मिळाली होती. ते घरीच बसून होते.
सूरज चव्हाण व राजन साळवी यांच्यावरील कारवाई हा मुंबईत झालेल्या महा पत्रकार परिषदेचा परिणाम असल्याचं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. शिवसेनेनं महा पत्रकार परिषद घेऊन नार्वेकर यांच्या निकालाची चिरफाड केल्यानं व सत्य लोकांसमोर नेल्यानं शिंदे गटानं हे उद्योग सुरू केले आहेत, असं राऊत म्हणाले.