दसऱ्याच्या दिवशी राजकीय, सामाजिक व सांस्कृितक मेळावे घेण्याची परंपरा महाराष्ट्रात आहे. मात्र यात सर्वाधिक चर्चा होते ती राजकीय मेळाव्यांची. यंदा महाराष्ट्रात पाच दसरा मेळावे होणार आहेत. सोबतच यंदा मनसे अध्यक्ष राज ठाकरे हेदेखील दसऱ्याच्या दिवशी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. पण राज ठाकरे हे कोणतीही जाहीर सभा घेणार नाहीत, तर ते पॉडकास्टद्वारे संवाद साधणार आहेत.
दसऱ्याच्या दिवशी (१२ ऑक्टोबर) महाराष्ट्रात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी मेळावा, उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा शिवतीर्थावर होणारा परंपरागत दसरा मेळावा, मागच्या दोन वर्षांपासून झालेला एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचा मेळावा आणि पंकजा मुंडे यांचा भगवान गडावरील मेळावा होणार आहे. तसेच, यंदा मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखालीदेखील एक दसरा मेळावा होणार आहे.
पण यंदा पहिल्यांदाच दसऱ्याच्या दिवशी राज ठाकरे यांची तोफ धडाडणार आहे. मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली आहे. राज ठाकरे हे गुडी पाडव्याच्या दिवशी मनसेचा मेळावा घेतात. पण यंदा ऐन निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार? याकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या संभांच्या आधी राज ठाकरे यांचा पॉडकास्ट होणार आहे. हा पॉडकास्ट शनिवारी सकाळी (१२ ऑक्टोबर) सोशल मीडियाच्या माध्यमातून जनतेपर्यंत पोहोचेल.
विशेष म्हणजे, राज ठाकरे यांच्या मनसेने पूर्वीच विधानसभा निवडणुकांचे रणशिंग फुंकले असून त्यांचे ७ उमेदवारही जाहीर झाले आहेत. जाहिरात आणि पॉडकास्टच्या माध्यमातून 'अभी नही तो कभी नही' या थीमवर मनसे कामाला लागली आहे. विधानसभेला राज आणि त्यांचा पक्ष ताकदीने मैदानात उतरणार आहे. त्यामुळे राज यांच्या भाषणाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संबंधित बातम्या