मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  raj thackeray news : राज ठाकरे होणार शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख?; नुसती चर्चा सुरू होताच विरोधाचे सूर

raj thackeray news : राज ठाकरे होणार शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख?; नुसती चर्चा सुरू होताच विरोधाचे सूर

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Mar 25, 2024 04:40 PM IST

Raj Thackeray and Shiv Sena News : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेची धुरा राज ठाकरे यांच्या हाती देण्याची चर्चा सुरू होताच त्याचे पडसाद उमटू लागले आहेत.

शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे?; नुसती चर्चा सुरू होताच विरोधाला सुरुवात
शिंदेंच्या शिवसेनेचे प्रमुख राज ठाकरे?; नुसती चर्चा सुरू होताच विरोधाला सुरुवात (ANI)

Raj Thackeray news : मनसे हा पक्ष एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत विलीन करून राज ठाकरे यांना त्या शिवसेनेचे प्रमुख करण्याची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. याबाबत अधिकृत कोणीही काहीही वाच्यता केलेली नाही. मात्र, त्याआधीच शिंदे समर्थक आमदारांनी असं कुठलंही पाऊल उचलण्यास कडाडून विरोध केला आहे.

राज ठाकरे यांनी दिल्लीत जाऊन अमित शहा यांची भेट घेतल्यापासून मनसे महायुतीत जाणार असल्याचं बोललं जात आहे. महायुतीत गेल्यास जागावाटप कसं असेल यावर सध्या काथ्याकूट सुरू आहे. मात्र, हे सगळं सुरू असतानाच राज ठाकरे यांना शिवसेनाप्रमुख करण्याचा एक प्रस्ताव भाजपनं दिल्याचं समजतं.

एकनाथ शिंदे व अजित पवारांच्या मदतीनं शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पाडूनही भाजपला निवडणुकीतील यशाची खात्री नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळंच आता मनसेला सोबत घेऊन ठाकरे विरुद्ध ठाकरे उभा करण्याची रणनीती सुरू आहे. मात्र, केवळ मनसेला युतीत घेण्याऐवजी त्यांना शिंदेंच्या शिवसेनेचं प्रमुख करून बाळासाहेबांचा खरा राजकीय वारस म्हणून पुढं आणण्याची रणनीती पडद्याआड सुरू असल्याचं सांगितलं जातंय.

शहाजी बापू पाटील म्हणतात…

राजकीय वर्तुळात सुरू असलेली ही चर्चा आता शिंदे गटाच्या आमदारांपर्यंतही गेली आहे. त्यामुळं त्यांच्यातही अस्वस्थता आहे. शिंदे गटाचे एक आमदार शहाजी बापू पाटील यांनी याबाबत टीव्ही ९ या वृत्तवाहिनीशी बोलताना स्पष्ट भूमिका मांडली आहे. 'आमच्या शिवसेनेचे पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आहेत आणि तेच राहिले पाहिजेत. त्याबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. तसं काही होत असल्यास आम्ही मुख्यमंत्री साहेबांची भेट घेऊन आमच्या भावना कळवू, असं त्यांनी म्हटलं आहे.

हे शक्य आहे का?

राज ठाकरे यांना शिंदेंच्या शिवसेनेचं प्रमुख करण्याची चर्चा असली तरी ते प्रत्यक्षात कितपत येईल याबाबत साशंकता आहे. निवडणूक आयोगानं शिवसेना हे नाव एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिलं असलं तरी आपणच खरी शिवसेना आहोत हे त्यांना जनतेच्या मनावर बिंबवता आलेलं नाही. अजूनही उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडंच लोक शिवसेना म्हणून पाहतात. शिवाय बाळासाहेब ठाकरे यांनी आपल्या हयातीतच उद्धव ठाकरे यांना वारस म्हणून निवडलं आहे. त्यामुळं राज ठाकरे यांच्याकडं शिंदे गटाचं नेतृत्व आलं तरी लोक त्यांना बाळासाहेबांचे खरे वारस मानण्याची शक्यता नाही. दुसरीकडं, शिंदे गटातूनच याला विरोध आहे. तिसरं म्हणजे राज ठाकरे स्वत: असं काही मान्य करण्याची शक्यता नाही. त्यामुळं ही चर्चा हवेतच विरण्याची शक्यता अधिक आहे.

IPL_Entry_Point