Raj thackeray On Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरुन मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे अमरावतीच्या दौऱ्यावर असून पत्रकारांशी अनौपचारिक गप्पा मारताना त्यांनी लाडकी बहीण योजनेवर सडकून टीका केली. लाडकी बहिण योजनेचा ऑक्टोंबरचा हप्ता दिल्यानंतर जानेवारीत सरकारच्या तिजोरीत ठणठणाट होणार आहे. यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना पगार द्यायलाही पैसे राहणार नाहीत, असं राज ठाकरे म्हणाले.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारने महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणली. आतापर्यंत या योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दोन हप्त्यांचे ३००० रुपये जमा झाले आहेत. आता तिसऱ्या हप्त्याचे १५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. या महिन्यात काही महिलांच्या खात्यात तीन महिन्याचे ४,५०० रुपये जमा झाले आहेत. दरम्यान या योजनेवरून राज ठाकरे यांनी मोठं भाकित केलं आहे.
राज ठाकरे म्हणाले की, निवडणुकीत फायद्यासाठी योजना आणली असेल तर ते चुकीचं आहे. कोणताही समाज फुकट काही मागत नाही. महिलांसाठी रोजगार उपलब्ध करण्यासाठी उद्योगधंदे उभारले पाहिजेत. सत्ताधाऱ्यांच्या स्वार्थासाठी योजना असेल तर परिणाम वाईट होतो. राज्य खड्ड्यात घातलं जात असेल तर ते चुकीचं आहे. लाडकी बहीण योजनेचा ऑक्टोबरचा हफ्ता दिल्यानंतर जानेवारीत सरकारच्या तिजोरीत ठणठणात होणार असून सरकारी कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठीही पैसे शिल्लक राहणार नाहीत, असं भाकित राज ठाकरे यांनी केलं आहे.
महाराष्ट्रात लाडकी बहीण योजना चांगलीच चर्चेत असून राज्यातील महिलांचा या योजनेला उत्सफूर्त प्रतिसाद मिळत आहे. या योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना महिन्याचे १५०० रुपये दिले जातात. मात्र या योजनेवरुन विरोधकांनी सातत्याने सरकारवर टीका केली आहे. सरकारकडून मतांसाठी ही लाच दिली जाते आहे अशी टीका संजय राऊत यांनी केली आहे. तसंच उद्धव ठाकरे, शरद पवार, प्रणिती शिंदे, नाना पटोले यांनीही आत्तापर्यंत अनेकदा या लाडकी बहीण योजनेवरुन महायुतीवर टीका केली आहे. आता राज ठाकरे यांनीही या योजनेवर अप्रत्यक्ष टीका केली आहे.