विधानसभा निवडणुका जसजशा जवळ येत आहेत, तसे ठाकरे कुटूंबातील राजकीय संघर्ष वाढत चालल्याचं दिसत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (MNS)अध्यक्ष राज ठाकरे यांचा मुलगा अमित ठाकरे यांनी पहिल्यांदाच आपले काका आणि माजी मुख्यमंत्री मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या टीकेला उत्तर दिले आहे. उद्धव ठाकरेंनी केलेल्या बिनशर्ट पाठिंब्याच्या वक्तव्यावर टीका केली आहे. अमित ठाकरे म्हणाले की, जेव्हा आपल्या मुलाला आमदार बनवायचे होते, तेव्हा त्यांना बिन शर्ट पाठिंबा चांगला वाटला होता, मग आताच का त्यांना हे अनैतिक वाटत आहे. त्यांनी उद्धव ठाकरेंनी सुनावले की, विसरू नका की, आमच्या या पाठिंब्यामुळेच तुमचा मुलगा आमदार झाला होता.
नुकत्याच झालेल्या शिवसेनेच्या वर्धापन दिन कार्यक्रमात उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरेंचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला होता. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरेंनी मोदींना बिनशर्थ पाठिंबा जाहीर केला होता. याची उद्धव ठाकरेंनी ‘बिनशर्ट’ पाठिंबा असं म्हणत उडवली होती.
या कार्यक्रमात उद्धव ठाकरे म्हणाले होते की, या लोकसभा निवडणुकीमुळे आपलं कोण व परकं कोण हे समोर आलं. काही जणांनी केवळ उद्धव ठाकरे नको म्हणून ‘बिन-शर्ट’ म्हणजे उघड पाठिंबा दिला. तर काही जणांनी लढण्याचे नाटक केले. मात्र,आम्ही नाटक करणारी माणसं नाही. नाटक ही कला आहे. आणि ही कला मोदींना जमते आम्हाला जमत नाही”,असं उद्धव ठाकरे म्हणाले होते.
उद्धव ठाकरेंच्या टीकेला उत्तर देताना अमित ठाकरे म्हणाले की, हाविनोद कळायलाही मला दहा मिनिटं लागली. वरळीत त्यांना जेव्हा बिनशर्त पाठिंबा दिला तेव्हा त्यांना काही वाटलं नाही. तेव्हा आमच्या पाठिंब्यावर त्यांनी मुलाला आमदार केलं. राज ठाकरेंनी जो पक्ष काढला आहे तो स्वतःच्या मेहनतीवर काढला आहे. पक्ष मोठा व्हायला वेळ लागला असेल तरीही तो आपल्या मेहनीतवर काढलेला पक्ष आहे हे कुणी विसरु नये. विधानसभा निवडणुकीत आम्ही आमची शक्ती दाखवू.
आमदार निवडून दिला की त्याच्याकडे काम करण्यासाठी पाच वर्षे असतात. कोरोना काळात वरळी मतदारसंघात कुणीही फिरकलं नाही. आता शेवटचे तीन-चार महिने फिरुन फारसा काही फरक पडणार नाही. आम्ही मोठ्या आशेने त्यांना बिनशर्त पाठिंबा दिला होता. म्हणत अमित ठाकरेंनी आदित्य ठाकरेंनाही टोला लगावला आहे.