Raj Thackeray On badlapur case : आदर्श विद्यालय शाळेत शिशू वर्गातील दोन विद्यार्थिंनीवरील सफाई कर्मचाऱ्याने अत्याचार केल्याच्या घटनेनंतर नागरिकांनी मंगळवारी जोरदार आंदोलन रेल्वे वाहतूक जवळपास ८ तास रोखून धरली. आंदोलकांनी सुरुवातीला शाळेसमोर आंदोलन करत तोडफोड केली त्यानंतर आंदोलक थेट बदलापूर रेल्वे स्थानकात पोहोचले आणि त्यांनी'रेल रोको'केला. यामुळे रेल्वे प्रवाशांचेही मोठ्या प्रमाणावर हाल झाले. बदलापूरमधील अत्याचार प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलेच तापलं आहे. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी सोशल मीडियावर पोस्ट करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांना कायदा व सुव्यवस्थेवरून धारेवर धरलं आहे.
राज ठाकरे यांनी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राज्यातील महिला खरचं तुमच्या लाडक्या बहिणी असतील तर आधी त्यांच्यामध्ये सुरक्षेची भावना निर्माण करा, असं राज ठाकरेंनी सुनावलं आहं. मुख्यमंत्र्यांच्या जिल्ह्यातच असा प्रकार घडत असेल तर इतर ठिकाणच्या परिस्थितीची कल्पनाही करायला नको असंही म्हटलं आहे.
राज ठाकरेंनी पोस्ट करत म्हटले की, बदलापूरमध्ये जी अत्यंत दुर्दैवी आणि भीषण घटना घडली, त्यावर मी काल पण म्हणलं तसं, यावर कारवाई व्हायला इतका वेळ का लागला? या विषयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या माझ्या महिला पदाधिकाऱ्यांनी वाचा फोडली, विषय लावून धरला, आणि त्यातून जनआक्रोशाला तोंड फुटलं, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
मुळात हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा जिल्हा. या जिल्ह्यातच जर कायदा धाब्यावर बसवला जात असेल तर बाकी ठिकाणची परिस्थिती काय असेल याची कल्पना पण करवत नाही,असंही म्हटलं आहे. शिंदे सरकारच्या महत्त्वाकांशी लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत राज ठाकरेंनी टोला लगावला आहे. आज सरकार'लाडकी बहीण' योजनेच्याद्वारे स्वतःच कौतुक करून घेण्यात मग्न आहे, पण जर तुमची बहीण खरंच लाडकी असेल तर तिच्यावर अशी वेळ येऊ नये आणि दुर्दैवाने आलीच तर तिला न्याय मिळेल हे पाहणं, हे पहिलं कर्तव्य नाही का?" असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला आहे.
जनतेच्या पैशातून, बहिणींना पैसे देऊन, स्वतःचं ब्रॅण्डिंग करण्यापेक्षा ती सुरक्षित आहे, ही भावना जरी निर्माण केलीत तरी खूप आहे, असा खोचक टोलाही राज यांनी लगावला आहे.
माझ्या पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांमुळे हा विषय आज समोर आलाय याचा मला अभिमान आहे. पण मुळात असे प्रकार घडू नयेत यासाठी कडक कायदे आणि त्याची अंमलबजावणी होणं गरजेचं आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
बदलापूर आंदोलनाबाबत मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कालच्या आंदोलनाने लाखो प्रवाशांना त्रास झाला. रेल्वे सेवा ८ ते ९ तास बंद होती. लाखो प्रवासी त्या रल्वेत होते. त्यातही मुलं होती, महिला होत्या, ज्येष्ठ नागरिक होते. हे आंदोलन राजकारणाने प्रेरित होते, असे माझे म्हणणे आहे. कारण एवढ्या लवकर... जेव्हा आंदोलन होते, त्यात स्थानिक लोक असतात. येथे स्थानिक लोक हाताच्या बोटावर मोजण्या एवढे होते आणि इतर ठिकाणावरून गाड्या भरून भरून त्या ठिकाणी आंदोलक आले होते. सरकारने सर्व मागण्या मान्य केल्या तरीही ते हटायला तयार नव्हते. याचा अर्थ त्यांना सरकारची बदनामी करायची होती.
खरे तर ज्यांनी केले त्यांना लाज वाटायला हवी, शरम वाटायला हवी. विरोधकांना माझे केवळ एवढेच सांगणे आहे की, 'मुख्यमत्री माझी लाडकी बहीण' योजनेमुळे जो काही पोटशूळ उठला आहे, तो कालच्या आंदोलनातून दिसला.
आंदोलक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे बोर्ड घेऊन आले होते. अशी आंदोलने पूर्वनियोजित असल्यावरचबोर्ड छापून आणतात. म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण, 'लाडक्या बहिणीचे पैसे नको, मुलगी सुरक्षित पाहिजे', 'लाडकी बहीण नको, सुरक्षित बहीण पाहिजे'असे बोर्ड आणले होते. या राज्यातील बहिणींना सुरक्षा देण्याची जबाबदारी आमची आहे. सरकारची आहे आणि यात, जे जे काही करता येईल कठोर, ते सरकार करेल.