जगाचा इतिहास हा भूगोलावर अवलंबून आहे. मात्र महाराष्ट्राचा भूगोल धोक्यात आहे. राज्यातील जमिनी विकत घेऊन महाराष्ट्राचं अस्तित्व संपवलं जात आहे.याची सुरूवात रायगड जिल्ह्यापासून होणार असून न्हावा शेवा शिवडी सी-लिंकमुळे पहिल्यांदा रायगड जिल्हा बरबाद होणार आहे, असा इशारा राज ठाकरेंनी पिंपरी चिंचवड येथील नाट्य संमेलनातून दिला आहे.
पिंपरी येथे भरलेल्या १०० व्या नाट्यसंमेलनात दीपक कारंजीकर यांनी राज ठाकरे यांची प्रकट मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरे म्हणाले, महाराष्ट्राने नेहमीच देशाचं प्रबोधन केलं आहे. ज्या महाराष्ट्रात शिवाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले, बाबासाहेब आंबेडकर, लोकमान्य टिळक होऊन गेले. तोच महाराष्ट्र आज जातीपातींमध्ये अडकू लागला आहे. ही धोक्याची घंटा आहे.
राज ठाकरे म्हणाले की, बाहेरचे लोक येतात, जमिनी घेतातयत आणि मालक होणार. त्यामुळे रायगडचे लोक येथे नोकर होणार. न्हावा शेवा शिवडी सीलिंकने रायगडचं वाटोळं होणार. या आधी मी पुण्याबद्दल तसं सांगितलं होतं, आता तेच होतंय.
राज ठाकरे म्हणाले की, ज्याला आपण इतिहास म्हणतो, तो पूर्णपणे भूगोलावर अवलंबून आहे. भूगोल म्हणजे जमीन. तुमची जमीन ताब्यात घेण्याचे प्रयत्न चालू आहेत. मुघलांनी, चंगेज खानाने, इंग्रंजांनी तेच केलं. दोन्ही महायुद्धं ही जमिनीसाठीच झाली. शिवाजी महाराजांनी तहात मुघलांना २८ किल्ले दिले होते. किल्ले का दिले? जमिनीसाठी. भूगोल काबीज करण्यासाठी ज्या लढाया झाल्या त्याला आपण इतिहास म्हणतो.
आज महाराष्ट्राचा भूगोल अडचणीत आहे.आधी जमीन घेण्यासाठी युद्ध केली जायचे तेव्हा समजत होतं की, हे जमीन घ्यायला आहेत. आते कळतही नाही की, तुमची जमीन कधी गेली. कारण आमचं लक्षच नाही. बाहेरचे लोक येत आहेत, आपल्या जमिनी विकत घेत आहेत. त्यापाठोपाठ आता आपला रायगडमधला माणूस तिथला नोकर बनून तिथे राहील किंवा त्याला रायगड जिल्हा सोडावा लागेल.