…तरच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो; पुतळ्याच्या पडझडीनंतर राज ठाकरे काय बोलले पाहाच!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  …तरच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो; पुतळ्याच्या पडझडीनंतर राज ठाकरे काय बोलले पाहाच!

…तरच आपण शिवरायांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो; पुतळ्याच्या पडझडीनंतर राज ठाकरे काय बोलले पाहाच!

Updated Aug 26, 2024 11:37 PM IST

RajThackeray : महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे.

शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत
शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्यानंतर राज ठाकरेंची पोस्ट चर्चेत

सिंधुदुर्ग किल्ल्याच्या समोर मालवणच्या राजकोट समुद्रकिनारी नौदलाच्या वतीने उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा आज कोसळला. ४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनानमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होतं. त्यानंतर ८ महिन्यातच हा पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन या काही प्रश्न उपस्थित केले आहे.

राज ठाकरे यांची पोस्ट -

"मालवण येथील राजकोट किल्ल्यावरचा छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याची बातमी मनाला वेदना देणारी आहे. महाराष्ट्राच्या आराध्य दैवताचा पुतळा, तो देखील अवघ्या ८ महिन्यांपूर्वी उभारला गेलेला, असा कोसळतोच कसा?

मुळात ज्या पुतळ्याचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते होणार आहे,त्याची तपासणी वैगरे काही केली होती का नव्हती?

आजच्या घटनेनंतर कुसुमाग्रजांच्या शहरातील'पाच पुतळ्यांवरची'कविता आठवली. ज्यांना माहित नसेल त्यांच्यासाठी ही कविता मुद्दामून देत आहे.

मध्यरात्र उलटल्यावर

शहरातील पाच पुतळे

एका चौथऱ्यावर बसले

आणि टिपं गाळू लागले .

ज्योतिबा म्हणाले,शेवटी मी झालो फ़क्त माळ्यांचा.

शिवाजीराजे म्हणाले,मी फ़क्त मराठ़्यांचा.

आंबेडकर म्हणाले,मी फ़क्त बौद्धांचा.

टिळक उद़्गारले,मी तर फ़क्त,चित्पावन ब्राम्हणांचा.

गांधींनी गळ्यातला गहिवर आवरला,आणि ते म्हणाले,

तरी तुम्ही भाग्यवान.

एकेक जातजमात तरी

तुमच्या पाठीशी आहे.

माझ्या पाठीशी मात्र

फ़क्त सरकारी कचेऱ्यातील भिंती !

पुतळे, स्मारकं ही फक्त आपल्यासाठी राजकीय सोय राहिली आहे. मी मागे पण अनेकदा म्हणलं होतं की, महाराजांचं खरं स्मारक, हे कुठला तरी भव्य पुतळा नसून, त्यांचे गड-किल्ले हे आहेत.

पण महाराजांच्या नावाने राजकारण करायचं, मतं मागायची, सत्ता मिळवायची, आणि मग स्मारकांची टेंडर काढायची, त्यातून काही मिळतंय का, हे बघायचं इतकंच राहिलं आहे.

ही प्रतिकांचं राजकारण करणारी व्यवस्था आता लोकांनी उद्ध्वस्त केली पाहिजे. आणि तसं घडलं, तरच आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात राहतो असं म्हणू शकतो."

- राज ठाकरे ।

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्यानंतर उद्धव ठाकरे पक्षाचे आमदार वैभव नाईक संतप्त झाले असून त्यांनी मालवणमधील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाची तोडफोड केली. पुतळ्याची देखभाल आणि निगा राखण्याची जबाबदारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे असल्याचं म्हणत वैभव नाईकांनी व्यक्त संताप केला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी यांनी सांगितले की, पुतळ्याच्या देखभालीची जबाबदारी नौदलाची होती.

Whats_app_banner

संबंधित बातम्या