Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा सवाल-raj thackeray questions victory claim by manoj jarange patil and maratha protesters ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा सवाल

Raj Thackeray : जरांगेंच्या आंदोलनामुळं मराठा समाजाला नेमकं काय मिळालं?; राज ठाकरेंचा सवाल

Feb 02, 2024 02:24 PM IST

Raj Thackeray on Maratha Morcha : मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाच्या यशावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.

Raj Thackeray on Manoj Jarange Andolan
Raj Thackeray on Manoj Jarange Andolan

Raj Thackeray on Maratha Aarakshan : ‘मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत काढलेल्या मोर्चामुळं मराठा समाजाला असा कोणता विजय मिळाला, मराठा समाजाला नेमकं काय मिळालं,’ असा रोकडा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केला आहे.

नाशिकमध्ये ते पत्रकार परिषदेत बोलत होते. जरांगे पाटील हे पुन्हा एकदा उपोषणाला बसणार आहेत. त्याबाबत विचारलं असता त्यांनी परखड मत मांडलं. ‘मनोज जरांगे यांची मी काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. तिथंही मी सांगितलं होतं की हे होणार नाही. हा तांत्रिक व कायदेशीर पेच आहे. हा निर्णय घ्यायचा असेल तर केंद्र सरकारला घ्यावा लागेल. मग हाच प्रश्न प्रत्येक राज्यात उभा राहील. विशेष अधिवेशन घ्यावं लागेल. सर्वोच्च न्यायालयात जावं लागेल. हे इतकं सोप्पं नाही, असं मी तेव्हाच सांगितलं होतं,’ असं राज ठाकरे म्हणाले.

Maharashtra Politics : छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर; राज्यात नव्या राजकीय समीकरणांची मांडणी

'यापूर्वी मराठा समाजानं मोठमोठे मोर्चे काढले होते. राज्यभर मोर्चे निघाले. आता पुन्हा तेच झालं. वस्तुस्थिती आपण पाहणार की नाही? की कोणाच्या तरी राजकीय अजेंड्याखाली आपण हे सगळं करत आहोत त्याचा विचार मराठा बांधवांनीही करायला हवा, अशी अपेक्षा राज ठाकरे यांनी व्यक्त केली.

विजय झाला, मग जरांगे पुन्हा उपोषण का करतायत?

‘नवी मुंबईत मुख्यमंत्री जरांगेंना भेटले. आंदोलन मागे घेतलं गेलं. विजयोत्सव साजरा झाला. काय विजय झाला? नेमकं काय मिळालं? असा कोणता विजय मिळाला? आणि जर विजय झाला आहे तर पुन्हा उपोषण करण्याची गरज काय आहे,’ असा प्रश्नही राज ठाकरे यांनी उपस्थित केला.

मुंबई काँग्रेसला मोठा धक्का, सिद्दीकी पिता-पुत्र अजित पवार गटात प्रवेश करणार

आरक्षणाच्या नावाखाली काय चाललंय हे सर्वांनाही माहीत आहे. कोणाचा कोणाला पाठिंबा आहे हे मीडियालाही माहीत आहे. त्यावर पुन्हा बोलण्याची गरज नाही. मी कधी-कधी बोलतो ते सुरुवातीला कडवट वाटतं, पण तेच सत्य असतं,' असं राज म्हणाले.

माझा टोलला विरोध नाही, पण…!

टोलला माझा विरोध नाही. ही पद्धत जगभर असते. टोलवसुलीच्या पद्धतीला माझा विरोध आहे. त्यात पारदर्शकता नाही हा माझा मुद्दा आहे. कोणाच्या खिशात पैसे जातात? सरकारला ते पैसे जातात का? त्या पैशातून आम्हाला सुविधा मिळतात का? मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवे बनून २० वर्षे होऊन गेली. एवढ्या वर्षात त्याचे पैसे वसूल झाले नाहीत का? हे सगळं समजत नसेल तर टोलला विरोध का करू नये?,' अशी विचारणाही राज ठाकरे यांनी केली.