मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  हा कुठला जज! ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, राज ठाकरेंची टीका

हा कुठला जज! ३०० शब्दांच्या निबंधाची शिक्षा पैशाच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, राज ठाकरेंची टीका

Jun 30, 2024 03:56 PM IST

Rajthackeray onpunePorschecase : पोर्शे कार भरधाव चालवून दोघांना उडवणाऱ्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा ही पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, अशी टीका राज ठाकरे यांनी केली आहे.

राज ठाकरेंची पोर्शे प्रकरणी न्यायाधीशांवर टीका
राज ठाकरेंची पोर्शे प्रकरणी न्यायाधीशांवर टीका

Raj thackeray on pune Porsche case : देशभर चर्चेत राहिलेल्या पुण्यातील  कल्याणीनगर  पोर्शे कार अपघातप्रकरणी राज ठाकरेंनी न्यायालयीन प्रक्रियेवर जोरदार टीका केली आहे. पोर्शे कार भरधाव चालवून दोघांना उडवणाऱ्या बिल्डरच्या अल्पवयीन मुलाला निबंध लिहिण्याची शिक्षा ही पैशांच्या देवाणघेवाणीशिवाय होऊच शकत नाही, असं राज ठाकरे (Raj thackeray) म्हणाले आहेत.  अमेरिकेत सॅन होजेला बृहन्महाराष्ट्र मराठी मंडळाचं अधिवेशन सुरु आहे. या वर्षीच्या अधिवेशनाला राज ठाकरे उपस्थित होते. या वेळी राज ठाकरेंची  एक प्रकट मुलाखत झली.  अभिनेते आनंद इंगळे आणि ज्येष्ठ पत्रकार अपर्णा वेलणकर यांनी  मुलाखत घेतली. यावेळी राज ठाकरेंनी राजकारण, समाजकारण, महाराष्ट्र, भाषा, कला, या आणि अनेक अशा अनेक  विषयांविषयी आपली मते मांडली.  

राज ठाकरे म्हणाले की, पुण्यातील पोर्शे अपघाताबाबत सर्वजण बिल्डरचा मुलगा, बिल्डर आणि त्याचा बाप, आणि अल्पवयीन आरोपीच्या आईबाबत बोलत आहेत. मात्र या अपघातात दोन जणांना जीव गमवावा लागला, त्यांच्याबाबत कोणच बोलताना दिसत नाही. गाडीखाली चिरडून मेलेल्या तरुण-तरुणीच्या आई वडिलांबाबत कोणी बोलत नाही. धक्कादायक म्हणजे ती केस कोर्टात गेल्यावर तेथील जज त्याला ३०० शब्दांचा निबंध लिहायला सांगतो. हा कुठला न्यायाधीश आहे. पैशांची देवाणघेवाण झाल्याशिवाय अशा प्रकारची शिक्षा होऊच शकत नाही. 

ट्रेंडिंग न्यूज

अशा प्रकरणानंतर तुम्ही विश्वास कोणावर ठेवणार, पोलीस, कोर्ट की सरकारवर असा सवाल राज यांनी उपस्थित केला. जनतेचा विश्वासच उडाला तर आराजक माजेल, असा इशाराही राज यांनी दिला. 

अमेरिकेमध्ये कोणीही पोलिसांवर हात उचलू शकत नाही. महाराष्ट्रात कोणीही येतो आणि पोलिसांवर हात उचलतो. या गुन्ह्यात त्याला एक दिवस तुरुंगात ठेवले जाते अन् सोडून दिले जाते. किती खाली जायचे याला काही मर्यादा आहे. आज जरी महाराष्ट्र जातीपातीत अडकला असला तरी हा महाराष्ट्र यातून निश्चितपणे बाहेर निघेल आणि महाराष्ट्राला मी यातून बाहेर काढेन. राज्यात किंवा राज्याबाहेर कुठेही, जगात दोन मराठी माणसे एकत्र आली की त्यांनी मराठीतच बोलावे. तरच मराठी समाज एकसंध राहिल. यासाठी इथे जन्मलेल्या प्रत्येक मराठी माणसाने प्रयत्न करायला हवेत, असा सल्लाही राज यांनी दिला. 

WhatsApp channel
विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर