राज्यात पेटलेल्या मराठा आरक्षणाच्या विषयावर चर्चा करण्यासाठी राज्य सरकारने उद्या, २० फेब्रुवारी रोजी विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावले आहे. तिकडे मराठा आरक्षणाच्या मु्द्दावर मनोज जरांगे पाटील यांचे जालना जिल्ह्यात आंतरवली सराटी गावात आमरण उपोषण सुरू आहे. दरम्यान, या मुद्दावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज पुन्हा आपली रोखठोक भूमिका मांडली आहे. ‘अधिवेशन आयोजित करून काहीही साध्य होणार नाही. हा विषय राज्याचा नाहीच आहे. हा केंद्र सरकारच्या अखत्यारितला आणि सुप्रीम कोर्टातला विषय आहे. यात काही तांत्रिक समस्या आहेत, हे मी मागेच सांगितलं होतं. ते सुटल्याशिवाय मराठा आरक्षणाचा विषय पुढे जाणार नाही. हे सगळं झुलवलं जातय. यातून हाताला काहीही लागणार नाहीए. हे होणार नाही म्हणून मी त्यांच्या समोरच (मनोज जरांगे) जाऊन सांगितलं होतं.’ असं राज ठाकरे आज म्हणाले. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत राज ठाकरे बोलत होते.
मराठा आरक्षणाच्या विषयावर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी यापूर्वी सुद्धा त्यांची स्पष्ट भूमिका जाहीर केली होती. त्यानंतर मनोज जरांगे यांनी राज ठाकरे यांच्यावर टीका केली होती.
मी एखादी गोष्ट बोलतो ती सुरूवातीला तुम्हाला कडवट वाटते. परंतु तेच सत्य असतं, असं मनोज जरांगे पाटील यांच्या नवी मुंबईतील आंदोलनानंतर राज ठाकरे म्हणाले होते. हे होणार नाही हे मी मनोज जरांगे पाटील यांना भेटून त्यांच्या समोर सांगितलं होतं. अशा प्रकारचा निर्णय कुठचेही राज्य सरकार घेऊ शकणार नाही. प्रत्येक राज्यामध्ये ही परिस्थिती आहे. प्रत्येक राज्यामध्ये हे कसं करणार आहे? त्यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये जावं लागेल. विशेष अधिवेशन बोलवावं लागेल. ते इतकं सोपं नाहीए, असं ठाकरे म्हणाले होते.
मराठा समाज आणि प्रत्येक समाजाने वस्तुस्थिती तपासून पाहिली पाहिजे असं आवाहन राज ठाकरे यांनी केलं होतं. कुणाचा तरी राजकीय अजेंडा आहे. त्यानुसार मोर्चे काढले जात आहेत. नवी मुंबईत मनोज जरांगे पाटील यांना मुख्यमंत्री जाऊन भेटले होते. तेथे विजयोत्सव साजरा झाला होता. त्या सभेत काय विजय मिळाला आणि कोणता विजय मिळाला होता, हे सर्वांना एकदा कळू तर दे? जे मराठा बांधव त्या मोर्चाला गेले होते, त्यांना नेमकं काय झालं हे कळलं तरी होतं का, असा सवाल राज ठाकरे यांनी केला. तुमच्या मते जर ती गोष्ट साध्य झाली होती तर मग आता परत उपोषणाला कशाला बसता, असा सवाल राज ठाकरे यांनी मनोज जरांगे पाटील यांना केला होता.