Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

Raj Thackeray : आरक्षण कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, राज ठाकरेंचा जरांगेंना सल्ला

Jan 27, 2024 06:14 PM IST

Raj Thackeray on Maratha Reservation : राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे मनोज जरांगे यांचं अभिनंदन करत त्यांना एक सल्लाही दिला आहे.

Raj Thackeray
Raj Thackeray

राज्य सरकारने मोठा निर्णय घेत मराठा समाजाला मोठा दिलासा दिला आहे. शिंदे सरकारने मनोज जरांगे यांच्या सर्व मागण्या मान्य करत नवीन अध्यादेश काढला आहे. हा अध्यादेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे यांची भेट घेऊन त्यांना सुपूर्द केला. यानंतर जरांगे यांनी आपले आंदोलन संपवत असल्याचे जाहीर केल्यानंतर राज्यभरात मराठा समाजाच्या वतीने एकच जल्लोष करण्यात आला. यावर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटत आहेत. ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ उल्लास बापट यांनी ही मराठा समाजाची दिशाभूल असल्याचे म्हटले आहे. या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ट्वीट करत प्रतिक्रिया दिली आहे. 

राज ठाकरेंनी मराठा आरक्षणाच्या लढ्याला यश आल्यामुळे मनोज जरांगे यांचं अभिनंदन करत त्यांना एक सल्लाही दिला आहे. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणाच्या अध्यादेशासाठी सरकारला शनिवारी १२ वाजेपर्यंत मुदत दिल्यानंतर राज्य सरकार कामाला लागले. मुख्यमंत्र्यांनी तातडीने उच्चस्तरीय बैठक बोलावून यावर चर्चा केली. वर्षा निवासस्थानी चालेल्या चार तासांच्या बैठकीत नवीन अध्यादेश काढला गेला. सरकारच्या शिष्टमंडळानं रात्री उशिरा मनोज जरांगे यांची भेट घेतली. जवळपास तीन तास शिष्टमंडळ आणि मनोज जरांगेंमध्ये चर्चा झाली. अध्यादेशामध्ये सग्यासोयऱ्यांच्या मुद्द्याचा समावेश करण्यात आलेला आहे. तसेच, मनोज जरागेंच्या मागण्याही मान्य करण्यात आल्या आहेत. पण तुमच्या सगळ्या मागण्या मान्य झाल्या आहेत, आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी असं म्हणत राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह राज्य सरकारवर थेट वार केला. 

मराठा आरक्षणावर राज ठाकरे यांची प्रतिक्रिया - 

राज ठाकरे यांनी ट्विट करत म्हटले आहे की, मनोज जरांगे पाटील ह्यांचं अभिनंदन. सरकारने तुमच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या ! आता फक्त आरक्षण मिळायचं बाकी आहे. ते कधी मिळणार हे पण एकदा मुख्यमंत्र्यांना विचारा , म्हणजे आपल्या मराठा बांधवांना , भगिनींना ही खरी परिस्थिती समजेल  ! लोकसभा निवडणूकी आधी पारदर्शकता येईल ही अपेक्षा !'

दरम्यान मराठा आरक्षणावर सरकारने काढलेल्या नव्या अध्यादेशानंतर मनोज जरांगे यांनी आपलं आंदोलन संपवले असल्याची माहिती समोर येत होती. दरम्यान, असे असतानाच मनोज जरांगे यांनी एक मोठं वक्तव्य करत पुन्हा सरकारची चिंता वाढवली आहे. मराठा आंदोलन संपवले नसून त्याला स्थगिती देत असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटले आहे.

Whats_app_banner

संबंधित बातम्या