हिप बोनचं (Hip Bone) दुखणं बळावल्यामुळे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS Chief Raj Thackeray) आज दुपारी लिलावती रुग्णालयात (Lilawati Hospital) दाखल होणार आहेत. यापूर्वीही याच शस्त्रक्रियेसाठी (Surgery) राज ठाकरे यांना लिलावतीत दाखल करण्यात आलं होतं. मात्र त्यावेळेस करोनाचे डेड सेल्स (Covid Dead Cells) त्यांच्या शरीरात आढळून आल्याने त्यांची शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आली होती. आता मात्र राज ठाकरे यांच्यावर उद्या ही शस्त्रक्रिया केली जाईल. यानंतर राज ठाकरे यांना दोन महिन्यांची सक्तीची विश्रांती घ्यावी लागणार आहे.
मध्यंतरीच्या काळात राज ठाकरे यांना टेनिस खेळताना ही दुखापत झाली होती. त्यानंतर डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करुन घेण्याचा सल्ला दिला होता. राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्यानं उचल खाल्ली होती. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्यावर ही शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.
राज ठाकरे यांच्या पायाच्या दुखण्याचा त्रास इतका वाढला होता की त्यांना धड उभं राहाणंही शक्य होत नव्हतं. त्यामुळे त्यांना आपला पुणे दौरा अर्धवट सोडावा लागला होता. तर अयोध्या दौराही राज ठाकरे यांना पुढे ढकलावा लागला होता.राज यांनी आपल्यावर केल्या जाणाऱ्या या शस्त्रक्रियेचा उल्लेख अलिकडेच झालेल्या एका भाषणात केला होता.
का होतो हिप बोनचा त्रास?
बदलती जीवन शैली, हाडात असणारी कॅल्शियमची कमतरता आणि एकाच स्थितीत बराच वेळ राहाणे ही हीप बोनची प्रमुख कारणं असल्याचं डॉक्टरांचं म्हणणं आहे.हिप बोनचा त्रास सांध्यांमध्ये जास्त पाहायला मिळतो असंही डॉक्टर सांगतात. कमरेच्या हाडांना होणारा हा त्रास हाडं आणि स्नायू यांच्यावर अतिरिक्त दबाव पडल्याने होतो असंही डॉक्टर सांगतात.
आपल्या शस्त्रक्रियेबद्दल काय म्हणाले होते राज ठाकरे?
आपल्या वाढत्या वजनाचा राज ठाकरे यांनी त्यांच्या एका सभेत आवर्जुन उल्लेख केला होता. जवळपास ३५ वर्षे माझं वजन ६३ किलो इतकंच होते. पण त्यानंतर वजन आणि इतर गोष्टी वाढायला लागल्या. आपण आरोग्यासंदर्भातील पथ्यपाणी खूप गांभीर्याने पाळली पाहिजेत. मात्र, आपण आज करू, उद्या करू, या नादात कायम टाळाटाळ करत राहतो. मला सध्या त्रास होत असल्यामुळे मला या सगळ्याची जाणीव होत आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे असंही राज ठाकरे यांनी आपल्या एका भाषणात म्हटलं होतं.