Raj Thackeray Live Speech In Thane City : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वर्धापन दिनानिमित्त राज ठाकरेंनी ठाण्यात मनसैनिकांच्या उपस्थितीत जाहीर सभा घेतली आहे. त्यात त्यांनी कार्यकर्त्यांना संघर्ष करत राहण्याचं आवाहन करत आगामी पालिकांच्या निवडणुकीत आपलीच सत्ता येणार असल्याचं वक्तव्य केलं आहे. नाशिकमध्ये आम्ही भरपूर काम केलं. आमच्या एकाही नेत्यावर भ्रष्टाचाराचा डाग लागला नाही. त्यामुळं लोकांना नेमकं काय हवं असतं, हे मला कळतच नाही, असं म्हणत राज ठाकरेंनी हतबलता व्यक्त केली आहे. माझ्या सभांना गर्दी होते पण मतं मिळत नाही, हा काही पत्रकारांचा प्रपोगंडा आहे, असल्याचा आरोपही राज ठाकरेंनी केला आहे.
मशिदींवरील भोंग्यांसाठी आम्ही आंदोलनं केली, पाकिस्तानी कलाकारांना आम्ही भारतातून हाकललं. मग इतर हिंदुत्ववादी पक्षांचा हिंदुत्ववाद म्हणजे नेमका काय?, माझ्या अयोध्या दौऱ्याला विरोध करणारेही हिंदुत्ववादीच होते, असं म्हणत राज ठाकरेंनी भाजपवर सडकून टीका केली आहे. सध्या जे महाराष्ट्रात सुरूय ते राज्याला खड्डात नेणारं आहे. इतकं घाण राजकारण, गलिच्छ भाषा मी कधीही पाहिलेली नाही, आम्ही भोंग्यांविरोधात आंदोलनं सुरू केली, त्यानंतर तात्कालीन महाविकास आघाडीच्या सरकारनं माझ्या अनेक मनसैनिकांना तुरुंगात टाकलं. परंतु त्यानंतरच त्याच व्यक्तीचं मुख्यमंत्रीपद गेलं, असं म्हणत राज ठाकरेंनी उद्धव ठाकरेंना टोला हाणला आहे.
जनसंघ, भाजप सत्तेत नसताना कित्येक लोकांनी खस्ता खाल्या, कष्ट केलेत, त्यानंतर भाजपला देशभरात सत्ता मिळालीये. १९५२ पासून जनसंघ संघर्ष करत होता. १९५२ ते २०१४ या काळात भाजपनं अनेक संकटांचा सामना केला. अनेक गोष्टीतून पक्ष जात असतो. आपला मळभ दूर होईल, सत्तेपासून आपण दूर नाहीये, असं म्हणत राज ठाकरेंनी मनसैनिकांना संघर्ष करत राहण्याचं आवाहन केलं आहे.