Who Is Navjyot Singh Gaud : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज पनवेलमध्ये निर्धार सभा घेण्यात आली आहे. यावेळी पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मुंबई-गोवा महामार्ग, समृद्धी महामार्ग, फोडाफोडीचं राजकारण आणि मराठी अस्मिता या मुद्द्यांवरून राज ठाकरे यांनी राज्य तसेच केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका केली आहे. याशिवाय उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरींवरही राज ठाकरेंनी हल्लाबोल केला आहे. त्यानंतर राज ठाकरेंनी परप्रांतीयांच्या मुद्द्यावरून सरकारला खडेबोल सुनावले आहे. तसेच कोकणातील मंडणगड तालुक्यात एका पंजाबी मराठी माणसाला तालुकाध्यक्षपदाची संधी देण्यात आल्याचंही राज ठाकरेंनी म्हटलं आहे. त्यामुळं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.
मनसेच्या निर्धार मेळाव्यात राज ठाकरे यांनी मनसेत अमराठी लोकही काम करत असल्याचं म्हटलं आहे. याशिवाय कोकणातील मंडणगड तालुक्याला अमराठी तालुकाध्यक्ष दिल्याचाही उल्लेख राज ठाकरे यांनी केला आहे. मनसेचे मंडणगड तालुकाध्यक्ष नवज्योत सिंग गौड यांचं नाव घेताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला. भाषणात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत मराठी बोलणाऱ्या सर्वांना आम्ही संधी देण्याचं काम करत आहोत. महाराष्ट्रात गेल्या कित्येक पिढ्यांपासून अनेक अमराठी लोक राहत आहे. त्यात मारवाडी, गुजराती, तमिळी आणि पंजाबी या लोकांचा समावेश आहे. मंडणगडचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा तालुकाध्यक्ष सरदार आहे, त्याच्या बोलण्यातून तो सरदार असल्याचं तुम्हाला समजणारही नाही. तो पूर्ण मराठी असून त्याचे घरचेही मराठी असल्याचं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
नवज्योत सिंग गौड हे पंजाबी असून ते शीख धर्मीय आहेत. त्यांना मनसेकडून मंडणगडच्या तालुकाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांचे कुटुंब गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात वास्तव्याला आहे. त्यामुळं त्यांना मराठी भाषा उत्तम बोलता येते. काही दिवसांपूर्वीच राज ठाकरेंनी मंडणगडमध्ये जाहीर सभा घेतली होती. त्यात त्यांनी पुढचा आमदार मनसेचाच असणार असल्याचा दावा केला होता. यावेळी राज ठाकरे यांच्या हस्ते नवज्योत सिंग गौड यांचा विशेष सन्मानही करण्यात आला होता. त्यानंतर आता नवज्योत सिंग गौड यांनी राज ठाकरेंच्या पनवेलमधील सभेला हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं.