Raj Thackeray Live Speech In Thane City : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १७ व्या वर्धापन दिनानिमित्त मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात जाहीर सभा घेतली आहे. त्यात त्यांनी मनसैनिकांशी संवाद साधत भाजप, शिंदे गट आणि मविआवर तुफान टोलेबाजी केली आहे. याशिवाय मराठी चित्रपटांना शो मिळत नसल्याच्या मुद्द्यावरून राज ठाकरेंनी चित्रपट फार येतायंत, कुणाकुणाला स्क्रीन्स मिळणार आहेत?, असा सवाल केला आहे. त्यामुळं आता राज ठाकरेंच्या या वक्तव्यावरून चर्चांना उधाण आलं आहे.
ठाण्यातील कार्यक्रमात बोलताना राज ठाकरे म्हणाले की, लोकाना फोनवरील संवाद मराठीत हवा आहे आणि दुकानांवरील पाट्या मराठीत करण्यासाठी यासाठी महाराष्ट्रात आंदोलनं का करावी लागतात. बाहेरच्या राज्यांमध्ये यासाठी आंदोलनं झालेली तुम्ही ऐकली आहे का?, आपल्याकडे मराठी चित्रपटांना स्क्रीन्स मिळत नाही, परंतु आता आठवड्याला बदाबदा चित्रपट प्रदर्शित होत असतील तर कुणाकुणाला स्क्रीन्स मिळणार आहे?, असा सवाल राज ठाकरेंनी केला आहे. आंदोलनं करणे, लोकांची प्रश्न सोडवणं या सगळ्या जबाबदाऱ्या मनसेच्याच आहेत का?, अर्धवट सोडलेलं एक आंदोलन दाखवा, टोलमुक्त आंदोलनात आम्ही काय केलं सर्वांना माहिती आहे. मनसेनं कोणकोणती आंदोलनं केली, कोणते प्रश्न सोडवलेत पुस्तकरुपात आलंय, ते लोकांसमोर मांडण्यासाठी कार्यकर्त्यांनी पुढे यावं, असंही राज ठाकरे म्हणालेत.
मोबाईल कंपन्या मराठीत संवाद साधत नव्हत्या. मनसे नेते अविनाश जाधव यांनी ठाण्यात कंपन्यांचं ऑफिस फोडलं आणि आता सगळं मराठीत सुरू आहे. त्यामुळं आमची आंदोलनच प्रभावी ठरतात, असं म्हणत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांचं कौतुक केलं आहे. याशिवाय गेल्या १७ वर्षांपासून कार्यकर्त्यांनी मोठी साथ दिली, मनसैनिकांचं सहकार्य मिळालं यासाठी मी स्वत:ला भाग्यवान समजतो, असंही राज ठाकरे म्हणाले. एके दिवशी मला पत्रकारानं मला ब्लू प्रिंट नाही तर ब्लू फिल्म बद्दल विचारलं, त्याच दिवशी मी ती दाखवली असती तर बरं झालं असतं, राज ठाकरेंनी असं वक्तव्य करताच सभागृहात एकच हास्यकल्लोळ उडाला.