मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  बाळासाहेबांचे की, बेगडी शरद पवारांचे ऐकणार?, राज यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

बाळासाहेबांचे की, बेगडी शरद पवारांचे ऐकणार?, राज यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

Shrikant Ashok Londhe HT Marathi
May 03, 2022 09:13 PM IST

भोंगे उतरवण्याच्या आपल्या भूमिकेवर ठाम असल्याचं राज ठाकरेंनी नमूद केलं आहे. मात्र, असं करताना राज ठाकरेंनी थेट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाच आव्हान दिलं आहे.

राज यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल
राज यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल

मुंबई -औरंगाबादमधील सभेसंदर्भात राज ठाकरेंविरोधात गुन्हा देखील दाखल झाला आहे. या पार्श्वभूमीवर आता राज ठाकरे भोंगे उतरवण्याबाबत नेमकी काय भूमिका घेतात, याविषयी उत्सुकता ताणली गेली होती. याबाबत राज ठाकरेंनी आता जाहीर पत्रक काढून आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

“आमचं मुस्लीम धर्मियांना एवढंच सांगणं आहे की हा सामाजिक विषय आहे हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रकत्न केला,तर आमच्याकडून त्याचं उत्तर धर्मानेच दिलं जाईल”,असा इशारा राज ठाकरेंनी आपल्या पत्रातून दिला आहे.

मुख्यमंत्री बेगडी शरद पवारांचे ऐकणार आहात का?

महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी "सर्व भोंगे बंद झालेच पाहिजेत" हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

देशात इतकी कारागृहं नाहीत की देशातल्या तमाम हिंदूंना कारागृहात डांबणे सरकारला शक्य होईल! हेसुद्धा सर्व सरकारांनी लक्षात घ्यावे.

नागरिकांसाठी तीन कलमी कार्यक्रम -

हिंदूंच्या सणांना सायलन्स झोन, शाळा, रुग्णालय अशा सर्व प्रकारच्या अटीशर्तीच्या नावाखाली मर्यादा घालायच्या,परंतु मशिदींना कोणत्याही प्रकारच्या अटी घालायच्या नाहीत! भारतीय संविधानाने सांगितलेल्या धर्मनिरपेक्षतेच्या कोणत्या व्याख्येत हे बसते? म्हणूनच हिंदूंनो,

१. त्यांना आपली हनुमान चालीसा ऐकवा.

२. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

३. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या १०० या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

सामाजिक भान बाळगत ज्या मशिदींवरील भोंगे उतरवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, त्या मशिदींशी संबंधित लोकांच्या स्तुत्य निर्णयाचे मी स्वागत करतो. तसंच, जिथे भोंगे उतरवण्यात आले आहेत, त्या मशिदींच्या परिसरात कोणताही त्रास होणार नाही, याची हिंदू बांधवांनीही काळजी घ्यावी.

WhatsApp channel

संबंधित बातम्या