Maharashtra Assembly Election 2024 : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची मुंबईतील भांडुप मतदारसंघातील उमेदवार शिरीष सावंत यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.यावेळीराज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून उद्धव ठाकरेंच्या बॅगा तपासल्याच्या घटनेवर भाष्य केलं. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कोणाच्या बॅगा तपासाव्या हे सुद्ध कळत नाही, उद्धव ठाकरेंच्या बॅगेत काय मिळणार आहे, फारफार तर हात रुमाल आणि कोमट पाण्याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही, अशी खिल्ली राज ठाकरे यांनी उडवली.
उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सलग दोन दिवस तपासल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. मीच पहिला गिऱ्हाईक कसा, मोदी आणि शाह यांच्याही बॅग तपासा, असे उद्धव ठाकरे म्हणाले होते. माझ्या बॅगा तुझ्याकडेच देतो, फक्त त्यातील कपडे चोरू नको, असा टोला उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदे यांना लगावला होता. यावर राज ठाकरे यांनी भाष्य केले आहे.
भांडूपमधील सभेत राज ठाकरे म्हणाले की, काल आणि आज उद्धव ठाकरेंची बॅग तपासली. खरं तर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना कुठं काय तपासावं हेसुद्धा कळत नाही. ज्या व्यक्तीच्या हातातून कधी पैसा सुटला नाही, त्या व्यक्तीच्या बॅगेत काय असणार आहे? फार फार तर हात रुमाल आणि कोमट पाणी, याशिवाय दुसरं काहीही असू शकत नाही. बॅग तपासल्यानंतर त्याचा मोठा बाऊ केला जात आहे. निवडणूक अधिकारी त्यांचं काम करत असतात. मुळात नियमानुसार बॅग तपासण्यात गैर काय? अनेकदा आमच्याही बॅगा तपासण्यात आल्या. त्याचा एवढा तमाशा करायची काय गरज. त्यातही ते संबंधित अधिकाऱ्यांचा व्हिडीओ काढतात. त्याला अपॉईंटमेंट लेटर दाखवायला सांगतात, कोणताही अधिकारी नियुक्ती पत्र खिशात घेऊन फिरतो का? कुणाला काय विचारावं, हे सुद्धा उद्धव ठाकरेंना माहिती नाही. त्यांना फक्त मला मुख्यमंत्री करा बाकी सर्व तेल लावत गेलं, असे आहे, असं राज ठाकरे म्हणाले.
ज्यांच्या हातात ३० वर्ष महापालिका आहेत. त्यातून शहराचा विचका झाला असून मराठी माणूसही उद्धवस्त झाला आहे. बाळासाहेब होते त्यावेळी त्यांचे बारीक लक्ष पालिकेच्या कारभारावर असायचं. पण यांचं बारीक लक्ष फक्त पैशावर असतं असा टोलाही यावेळी राज यांनी उद्धव यांचं नाव न घेता लगावला.
राज ठाकरे म्हणाले, पैशाने विकले जाणाऱ्या नेत्यांना निवडून देऊ नका. यावेळची निवडणूक गंमतीत घेऊ नका, कारण ज्या प्रकारच्या गोष्टी झाल्या आहेत. उद्या जर समजा अशाच प्रकारच्या गद्दारांना पाठिंबा मिळणार असेल तर त्याचा समजहोईल की, त्यांनी जे केलंय तेबरोबर आहे. तसे झाले तर भविष्यात महाराष्ट्राला देवच वाचवू शकतो.