MNS Vs NCP : पुणे दौऱ्यावर असताना मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपल्या खास शैलीत अजित पवार यांच्यावर टीका केल्यामुळं मनसे व अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये वाद पेटला आहे. हा वाद तोडफोड आणि अश्लाघ्य टीकेपर्यंत पोहोचला आहे. एकमेकांना तुडवण्याची भाषाही सुरू झाली आहे. या वादाची सुरुवात नेमकी कशी झाली आणि आतापर्यंत काय झालं, यावर एक नजर…
राज ठाकरे दोन दिवसांपूर्वी पुणे दौऱ्यावर होते. तिथं त्यांनी पत्रकार परिषद घेऊन पुण्यातील पुराच्या परिस्थितीबाबत चिंता व्यक्त केली. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी या सगळ्याकडं लक्ष द्यायला हवं अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. हे सांगताना एक उपमुख्यमंत्री पुण्याचेच आहेत. ते इथं नसताना धरणं भरली. एवढं पाणी पडलं, असं राज म्हणाले. त्यांचा रोख काही वर्षांपूर्वी धरणातील पाण्याबाबत अजित पवार यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याकडं होता.
राज यांच्या या वक्तव्यावर अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी तिखट प्रतिक्रिया दिली. त्यांनी राज ठाकरे यांना सुपारीबाज म्हणून हिणवलं. टोलपासून मराठीच्या मुद्द्यापर्यंत एकही आंदोलन यांना यशस्वी करता आलेलं नाही. राज्यातल्या आजवरच्या सर्वात अयशस्वी नेत्यानं अजित पवार यांच्याबद्दल बोलण्याची गरज नाही. राज ठाकरे यांना एनडीआरएफचा फुलफॉर्मही माहीत नाही आणि ते आपत्ती व्यवस्थापनाबद्दल बोलतात, हा आतापर्यंतचा सर्वात मोठा राजकीय जोक आहे, असं मिटकरी म्हणाले होते.
मिटकरी यांच्या टीकेमुळं संतापलेल्या मनसेच्या कार्यकर्त्यांनी अमोल मिटकरी यांच्या गाडीवर जोरदार हल्ला चढवला व तोडफोड केली. मिटकरी यांना कुठलीही इजा झाली नाही. त्यांच्या गाडीवर हल्ला करणाऱ्या मनसेच्या कार्यकर्त्याचा काही तासातच मृत्यू झाला. त्यामुळं प्रकरण आणखी चिघळलं. दोन्हीकडून एकमेकांवर गुन्हे दाखल करण्याचे प्रयत्न सुरू आहे. त्या दरम्यान शाब्दिक खडाजंगीही सुरू आहे.
मनसेचे सरचिटणीस कर्णबाळा दुनबळे यांनी मिटकरी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. ‘अमोल मिटकरी यांची पात्रता नाही आणि त्यांची लायकी नाही. अजित पवारांनी हात दिला नसता तर तुमची लायकी काय होती हे लक्षात ठेवा. कोणाबद्दल बोलतो याचं भान राखा. मी फरार असल्याचं ते म्हणतात हे हास्यास्पद आहे. मिटकरींच्या तोंडाला मूळव्याध झालाय. त्यांच्याबद्दल किती आणि का बोलायचं, असा प्रश्न दुनबळे यांनी केला. 'आम्हाला नामर्द म्हणणारे मिटकरी टॉयलेटमध्ये लपले. त्यांना तुडवणार म्हणजे तुडवणार. त्यांना कुत्र्यासारखं मारणार, असा इशारा दुनबळे यांनी दिला.
मनसेचे प्रकाश महाजन यांनीही मिटकरी यांच्यावर एकेरी भाषेत टीका केली. अजित पवार गटाला महायुतीतून बाहेर पडायचं आहे. त्यासाठी ते कारणं शोधत आहेत. मिटकरी हे राज ठाकरेंना सुपारीबाज म्हणतात. त्याच्याकडं काय पुरावा आहे? सुपारीबाज तर अजित पवार आहेत. त्यांच्यावर खुद्द पंतप्रधान मोदी यांनी आरोप केले आहेत. लोकसभेला मनसेची मदत घेतली तेव्हा तुम्हाला राज ठाकरे सुपारीबाज वाटले नाहीत का, असा सवाल महाजन यांनी केला. आमच्या कार्यकर्त्याच्या मृत्यूची जबाबदारी अजित पवारांची आहे. अमोल मिटकरी, उमेश पाटील आणि अजित पवार यांच्यावर राज्य सरकारनं सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी प्रकाश महाजन यांनी केली.
संबंधित बातम्या