आपल्या वाढदिवशी भेटायला येताना कार्यकर्त्यांनी पुष्पगुच्छ, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नये, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मनसे सैनिकांना केले आहे. राज ठाकरेंचा वाढदिवस १४ जून रोजी असतो. यादिवशी ते दिवसभर मनसे सैनिकांना भेटत असतात. दरवर्षी ते वाढदिवसाच्या आधी मनसे सैनिकांना आवाहन करत असतात. गेल्यावर्षी त्यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केले होते की, पुष्पगुच्छ, मिठाई, केक आणू नका, मात्र,तरीही भेटवस्तू आणण्याची इच्छा असेल, तर झाडाचे रोप किंवा शैक्षणिक साहित्य आणू शकता.
राज ठाकरेंनी ट्विट केले आहे की, दर वर्षी १४ जूनला माझ्या वाढदिवसाच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने मला भेटायला, शुभेच्छा द्यायला येतात. त्यावेळी तुमची होणारी भेट, तुमच्याकडून मिळणाऱ्या शुभेच्छा हीच माझ्यासाठी तुमच्याकडून मिळणारी मोठी भेट असते. पण तरीही महाराष्ट्र सैनिक येताना पुष्पगुच्छ, केक, मिठाई किंवा भेटवस्तू घेऊन येतात.पण ह्यावर्षीपासून माझी तुम्हाला मनापासून विनंती आहे की, कृपया पुष्पगुच्छ, केक, मिठाई अथवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. आपली भेट हिच माझ्यासाठी भेट आहे ! सकाळी ८:०० ते १२:०० ह्या वेळेतच मी उपस्थित असेन.
महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर आता सर्व पक्ष विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यामुळे राज ठाकरे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. मोदी ३.० कॅबिनेट शपथविधी सोहळ्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना निमंत्रण दिले होते. मात्र काही कारणास्तव राज ठाकरे शपथविधी सोहळ्याला हजर राहिले नाहीत. मात्र यावर राज ठाकरे यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. यानंतर आता सर्वांची नजर राज ठाकरेंच्या पुढील निर्णयावर आहे. लोकसभा निवडणुकीत एनडीएचे प्रदर्शन महाराष्ट्रात समाधानकारक झाले नाही. त्यांना केवळ १७ जागा मिळाल्या.
जेव्हा मनसे अध्यक्ष राज ठाकरे महायुतीसाठी प्रचार करत होते, तेव्हा अंदाज व्यक्त केला जात होता की, भाजप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला याचे रिटर्न गिफ्ट विधानसभा निवडणुकीत देईल. दरम्यान लोकसभा निवडणुकीत मनसेने एक सीट मागितली होती, जी मिळाली नाही. मनसे NDA मध्ये सामील झाली नसली तरीराज ठाकरे यांनी मोदींना बाहेरून पाठिंबा दिला होता. राज ठाकरे मुंबईतील मोदीच्या सभेतही व्यासपीठावर दिसले होते. आता विधानसभा निवडणुकीत राज ठाकरे कोणाला पाठिंबा देतात किंवा त्यांचा काय स्टँड असणार, याकडे सर्वांची नजर लागली आहे