Raj Thackeray on Election : राज्यातील विधानसभा निवडणुकांवर अनेकांनी शंका व्यक्त केली होती. काही उमेदवारांनी तर थेट पैसे भरून पुन्हा मतमोजणी करून घेतली होती. त्यानंतर आता आज राज ठाकरे यांनी देखील राज्याच्या निवडणूक निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. त्यांनी ईव्हीएमवर देखील शंका व्यक्त केली आहे. लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांचा एक खासदार निवडून आला असताना त्यांना विधानसभा निवडणुकीत ४३ जागा कशा मिळाल्या ? असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत निवडणूक आयोगावर व विधानसभा निवडणुकीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी निवडणूक निकालाची चिरफाड केली.
राज ठाकरे म्हणाले, 'मी बऱ्याच दिवसांनी तुम्हाला भेटतोय. विधानसभा निवडणुकीचे निकाल लागल्यावर मी त्यावर भाष्य केलं होतं. तेव्हा मी काही फारसं बोललो नव्हतो. त्यामुळे मी शांत बसलो होतो असा त्याचा अर्थ नव्हता. मी सर्व गोष्टींचा विवेचन करत होतो. या काळात मला अनेक जण भेटली. त्यांनी निवडणुक निकालावर प्रश्नचिन्ह देखील उपस्थित केले होते. निवडणुकीचा निकाल लागल्यावर राज्यात फारसा जल्लोष नव्हता. राज्यात अक्षरक्ष: सन्नाटा पसरला होता. जसा जल्लोष व्हायला हवा होता तसा झाला नाही.
राज ठाकरे म्हणाले, माझ्याकडे एक व्यक्ती आली होती. ती व्यक्ती संघाशी निगडीत होती. त्यांना हा निकाल पटला नाही असं त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसत होतं. ते मला म्हणाले, 'इतना सन्नाटा क्यू है भाई. कोई तो जीता होगा'. कोणीतरी जिंकला असेल ज्याच्यातून जल्लोष होईल. पण महाराष्ट्रामध्ये निवडणूक निकालानंतर असा सन्नाटा कधीच प्रसरला नव्हता. हा निकाल कसलं उदाहरण आहे. काही काही गोष्टींवर माझा विश्वासच हा बसूच शकत नाही.
राज ठाकरे म्हणाले, बाळासाहेब थोरात सातवेळा आमदार झाले. ही त्यांची आठवी निवडणूक होती. ते सातवेळेला ७० ते ८० हजारांच्या मताधिक्याने निवडून आले आहे. यावेळी १० हजार मतांनी ते पराभूत झाले. मीच नाही तर सत्तेत असलेल्या अनेकांनी थोरात यांच्या निकालावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. त्यांना देखील या निकालाचा मोठा धक्का बसला आहे.
राज ठाकरे यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या निवडून आलेल्या जागांवर देखील प्रश्न उपस्थित केला. ठाकरे म्हणाले, भाजपला १३२ जागा मिळाल्या. त्यांना गेल्या वेळी १०५ जागा मिळाल्या होत्या. पण अजित पवार यांचा लोकसभेत केवळ एक खासदार निवडून आला असतांना त्यांना ४३ जागा मिळाल्या कशा ? त्यांना चार-पाच जागा देखील निवडून येतील की नाही या बाबत शंका होती. ज्यांनी इतके वर्षे महाराष्ट्रात राजकारण केले त्यांना फक्त १० जागा कशा मिळतात ? हे न समजण्यापलीकडचं आहे. राज्यात लोकसभेला काँग्रेसचे १३ खासदार निवडून आले. तर शरद पवार यांचे ८ खासदार निवडून आले. एका खासदाराच्या खाली सहा आमदार निवडून येत असतांना शरद पवार यांचे फक्त १० आमदार निवडून येतात. मात्र, अजित पवार यांचा फक्त एक खासदार निवडून येत असतांना त्यांचे ४३ आमदार निवडून कसे आले हा संशोधनाचा विषय आहे. तुम्ही या मतदानावर जाऊ नका. जर अशाप्रकारे निवडणुका होत असतील तर त्या न लढवलेल्याच बऱ्या, असे ठाकरे म्हणाले.
संबंधित बातम्या