मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  RTI : राज्यपाल असताना कोश्यारींनी गोळा केलेल्या देणग्यांची माहितीच राजभवनकडे नाही; आरटीआयमधून खुलासा

RTI : राज्यपाल असताना कोश्यारींनी गोळा केलेल्या देणग्यांची माहितीच राजभवनकडे नाही; आरटीआयमधून खुलासा

Ganesh Pandurang Kadam HT Marathi
Feb 22, 2024 04:39 PM IST

Bhagat Singh koshyari donation news : राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आपल्या खासगी संस्थांसाठी घेतलेल्या देणग्यांचा तपशील राजभवनकडं नसल्याचं समोर आलं आहे.

Bhagat Singh Koshyari
Bhagat Singh Koshyari

Bhagat Singh koshyari donation news : महाविकास आघाडी सरकारच्या काळात अत्यंत वादग्रस्त ठरलेले राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. कोश्यारी राज्यपाल असताना स्वत:च्या संस्थांसाठी घेण्यात आलेल्या देणग्यांचा तपशीलच राजभवनात नसल्याचं समोर आलं आहे.

आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांनी माहिती अधिकाराखाली या संदर्भात विचारणा केली होती. भगतसिंग कोश्यारी यांनी राज्यपाल असताना त्यांचा संबंध असलेल्या सरस्वती शिशू मंदिर, पिठोरगड, विवेकानंद विद्या मंदिर इंटर कॉलेज, पिठोरगड आणि सरस्वती विहार हायर सेकंडरी, नैनिताल या शैक्षणिक संस्थेसाठी राज्यातील उद्योगपती, विकासक आणि अन्य लोकांकडून देणग्या घेतल्या होत्या. या देणग्यांची सविस्तर माहिती गलगली यांनी मागितली होती.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे परिवार प्रबंधक कार्यालयाच्या कार्यालयीन अधिक्षिका यांनी त्यावर नकारार्थी उत्तर दिलं आहे. राज्यपालांच्या संस्थांशी संबंधित देणग्यांचा राजभवनाशी संंबंध नाही. त्यासाठी संबंधित संस्थेशी संपर्क साधावा, असं राजभवनातील परिवार प्रबंध कार्यालयानं स्पष्ट केलं आहे.

राजभवनाच्या उत्तराविरोधात गलगली आपिलात

राजभवनानं नाकारलेल्या आदेशाविरोधात गलगली यांनी प्रथम अपील दाखल केलं आहे. कोश्यारी यांनी राज्यपाल असताना खासगी संस्थांसाठी देणग्या वसूल केल्या आहेत. त्यांनी तशी माहिती राज्य सरकार आणि राज्यपालांच्या परिवार प्रबंधक कार्यालयाकडं देणं आवश्यक होतं. तशी माहिती न दिल्यास राज्यपालांच्या परिवार प्रबंधकांनी त्यांना लेखी पत्र पाठवून माहिती मागवायला हवी व ती माहिती अभिलेखावर जतन करायला हवी, असं गलगली यांचं म्हणणं आहे.

कोश्यारींनी माहिती लपवली!

राज्यपाल पदावर असताना वसूल केलेल्या देणग्यांची माहिती राजभवनाकडं असणं आवश्यक आहे, मात्र कोश्यारी यांनी गुपचूपपणे घेतलेल्या देणग्यांची माहिती लपवली आहे. याबाबत राज्य सरकारनं चौकशी करणं गरजेचं आहे, अशी मागणी अनिल गलगली यांनी विद्यमान राज्यपाल रमेश बैस व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं केली आहे.

IPL_Entry_Point

विभाग