Maharashtra Rain Update : मराठवाड्यातील परभणी आणि लातूर जिल्ह्यांना सलग दोन दिवस पावसाने झोडपले. वादळी वाऱ्यासह वीजांच्या कडकडाटासह झालेल्या पावसामुळे नागरिकांची त्रेधा उडाली. तब्बल तासभर हा पाऊस झाला. पासवामुळे शहरातील रस्ते जलमय झाले होते. काही ठिकाणी रस्त्यावर गुडघ्याएवढे पाणी साचल्याने येथून मार्ग काढतांना नागरिकांची गैरसोय झाली. तर काही ठिकाणी वाहतूक कोंडी झाल्याचे पाहायला मिळाले.
हवामान विभागाने राज्यात मराठवाडा व विदर्भात पुढील काही दिवस पावसाचा इशारा दिला आहे. परभणी आणि लातूर जिल्ह्यात सलग दोन दिवस पासवाने हजेरी लावली. गंगाखेड तालुक्यात मोठ्या प्रमाणात वीजांचा कडकडाट व वादळी वार्यक्ष पुस पडला. वीज कोसळल्याने या तालुक्यात काही ठिकाणी काही जनावरांचा मृत्यू झाला. या घटनेत एक महिला ही जखमी झाली.
गंगाखेड तालुक्यात शनिवारी गुडेवाडी, घटांग्रा, तांदुळवाडी, इळेगाव येथे पावसाने कहर केला. या ठिकाणी वीज कोसळून २ बैल, २ म्हैस व ६ शेळ्या ठार झाल्या तर एक महिला देखील जखमी झाल्याचे वृत्त आहे. मन्नाथ तलाव परिसरात एका महिलेच्या झोपडीवर वीज कोसळली तर इळेगाव येथे वीज कोसळल्याने एक महिला जखमी झाली आहे. जयश्री बैकरे असे या महिलेचे नाव असून त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
लातूर जिल्ह्याला देखील जोरदार पावसाने झोडपले. लातूरच्या औसा जिल्ह्यात जोरदार पाऊस झाला. यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले. पावसाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकांना बसला. सकाळी देखील काही भागात हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. तासभर झालेल्या पावसामुळे शेतात पाणी सचल्याने त्यांना तलावाचे रूप आले होते.