मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  १८ तास पडलेल्या पावसानं सांगलीकरांची दैना, तर जत तालुक्यात पाणीच पाणी
सांगली शहरात जागोजागी हेच चित्र पाहायला मिळतंय
सांगली शहरात जागोजागी हेच चित्र पाहायला मिळतंय (हिंदुस्तान टाइम्स)
20 May 2022, 10:01 AM ISTDilip Ramchandra Vaze
  • Share on Twitter
  • Share on FaceBook
20 May 2022, 10:01 AM IST
  • मान्सूनपूर्व पावसाने सांगली आणि जत या भागांना झोडपून काढलंय. जत या दुष्काळी भागात प्रामुख्याने पावसाने जोरदार हजेरी लावलीय. सांगलीतही १८ तास पडणारा पाऊस थांबायचं नावच घेत नाहीये.

सांगली आणि कोल्हापूरला मान्सून पूर्व पावसाने चांगलंच झोडपून काढल्याचं चित्र पाहायला मिळालं.सांगलीत तर महानगरपालिका क्षेत्रासह जिल्ह्यातील अनेक भागात गेल्या १८ तासांपासून मान्सूनपूर्व मुसळधार पावसाने लोकांची दैना उडवलीय. ढगांच्या गडगडाट आणि पावसाची मुसळधार यानं सांगलीचं जनजीवन विस्कळीत झाल्याचं पाहायला मिळालं आहे. सांगलीत सध्याही पाऊस सुरुच आहे. मात्र त्याचा जोर काहीसा कमी असल्याचं सांगितलं जात आहे. या पावसामुळे सांगलीकरांची मात्र मोठी दैना उडाली आहे. जागोजागी सखल भागात पाणी साचून राहिल्याने लोकांना तारेवरची कसरत करावी लागत असल्याचं चित्र पाहायला मिळतंय. तर दुसरीकडे जत तालुक्यातील अनेक ओढ्यांना पूर आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने धोकादायक परिस्थिती वाहनधारक त्यातूनच वाट काढत जात आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

सांगलीत गेल्या दोन दिवसांपासून पावसाळी हवा अनुभवायला मिळालीय. यंदा पावसानं मी लवकर येईनचा सांगावा धाडलाय. गुरुवारच्या संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास दमदार पावसाला सुरवात झाली. वातावरण अंधारून आलं होतं. अर्धा तास दमदार पाऊस झाला. त्यानंतर तब्बल १८ तास पावसाची रिपरिप सुरुच आहे. रात्री उशीरापर्यंत विजा चमकत असल्याचं पाहायला मिळालं होतं. शहराच्या सखल भागात नेहमीप्रमाणे तळी साचली. शंभर फुटी रस्ता, भरतनगर, रामनगर परिसरासह श्‍यामरावनगरमध्ये रिकामे प्लॉट पुन्हा भरले. पावसाचा परिणाम थेट शहरातील वाहतुतीवर झाला. संततधार पडणाऱ्या या पावसामुळे मात्र पालिका कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. जिल्ह्यात तासगाव, कवठेमहांकाळ, कडेगाव, पलूससह, खानापूर आणि जत या ठिकठिकाणी पावसाने कमी अधिक प्रमाणात हजेरी लावली. जत तालुक्यातील अनेक भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने कोरडे पडलेले ओढे आता ओसंडून वाहत आहेत. वळसंग येथील सावळ ओढा दुथडीभरून वाहत असल्यान पुलावरुन पाणी जात आहे. अशातच वाहन धारक पुलावरून धोकादायक रितीने आपली वाहनं हाकताना दिसत आहेत. उन्हाळी पिकांसाठी हा पाऊस पोषक असून द्राक्ष, ऊस व अन्य फळ पिकांनाही तो फायदेशीर आहे. उन्हाने लाहीलाही झालेली असताना दमदार पावसाने सगळीकडे वातावरण आल्हाददायक झालं आहे.

 

 

  • Share on Twitter
  • Share on FaceBook