मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Maharashtra Rain Updates : राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भात पूर तर नाशिकमध्ये संततधार

Maharashtra Rain Updates : राज्यभरात मुसळधार पावसाची हजेरी; विदर्भात पूर तर नाशिकमध्ये संततधार

Atik Sikandar Shaikh HT Marathi
Aug 17, 2022 09:35 AM IST

Maharashtra Rain Updates : गेले काही दिवस राज्यात दडी मारलेल्या पावसानं पुन्हा जोर धरला आहे. विदर्भात सुरू असलेल्या पावसामुळं अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे.

Maharashtra Rain Updates
Maharashtra Rain Updates ( Anil Shinde)

Maharashtra Rain Live Updates : राज्यात गेल्या काही दिवसांपासून पावसानं दडी मारली होती. परंतु आता कालपासून राज्यातील अनेक भागांमध्ये पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली असून नाशिकसह मुंबईच्या काही भागातही संततधार पावसाची नोंद करण्यात आली आहे.

भंडारा-गोंदिया जिल्ह्यांत पूर...

जुलै महिन्याच्या दुसऱ्या आणि ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात विदर्भाला पावसानं चांगलंच झोडपलं होतं, त्यानंतर आता काल संध्याकाळपासून विदर्भात पु्न्हा अतिवृष्टी झाल्यानं भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाली आहे. सतत सुरू असलेल्या पावसामुळं अनेक नद्या आणि नाल्यांना पूर आल्यामुळं जिल्हा प्रशासनानं शाळा, शिकवणी आणि अंगणवाड्यांना सुट्टी जाहीर केली आहे. याशिवाय जिल्हा प्रशासनानं जारी केलेल्या आदेशांचं उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आहे.

चंद्रपूर आणि गडचिरोलीत पूरस्थिती कायम...

गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत सातत्यानं होत असलेल्या पावसामुळं दोन्ही जिल्ह्यांत पूर आला होता. परंतु अजूनही या जिल्ह्यांध्ये मुसळधार पाऊस सुरूच असल्यानं पूरस्थिती कायम आहे. काल झालेल्या मुसळधार पावसामुळं गोसीखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. याशिवाय चंद्रपूर आणि भंडारा जिल्ह्यातील अनेक मार्ग अजूनही मुसळधार पावसामुळं बंदच आहेत.

नाशिक आणि मुंबईत संततधार...

गेल्या काही तासांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वरमध्ये होत असलेल्या संततधार पावसामुळं जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून आता गंगापूर धरणातून सहा हजार क्यूसेक वेगानं पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास धरणातून आणखी पाणी गोदापात्रात सोडण्यात येणार असल्याची माहिती नाशिक जिल्हा प्रशासनानं दिली आहे. याशिवाय मुंबई आणि उपनगरांच्या भागातही कालपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. त्यामुळं शहरातील रस्त्यांवर पाणी साचल्यानं त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला आहे.

IPL_Entry_Point