Pune Rain update : पुण्याला पावसाने चांगलेच झोडपले आहे. बुधवारी सकाळपासून शहरात पावसाची संततधार सुरू आहे. जिल्ह्यात बहुतांश भागात पावसाचा जोर वाढला आहे. खडकवासला धरण परिसरात देखील जोरदार पाऊस सुरू असल्याने धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू आहे. त्यामुळे आज गुरुवारी पहाटे खडकवासला धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग वाढवण्यात आला आहे. आज सकाळी ४ वाजता खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा २२८८० क्युसेक्स विसर्ग वाढवून तो ३५,५७४ क्यूसेक्स करण्यात आला आहे. आज सकाळी सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील नदीपत्रालगत असणाऱ्या काही सोसायट्यांमध्ये पाणी घुसल्याचा प्रकार देखील उघडकीस आला आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, पुण्यातील भिडे पूल देखील पाण्याखाली गेल्याने येथील वाहतूक ही वळवण्यात आली आहे.
पुण्यात गेल्या काही दिवसांनपासून पावसाचा जोर वाढला आहे. गेल्या आठवड्यापासून पुण्यात जोरदार पाऊस पडत आहे. पुण्यातील घाट विभागात देखील पावसाचा जोर वाढला आहे. या पावसामुळे पुण्यातील धरणात पाण्याची आवक वाढली आहे. दरम्यान, बुधवारी रात्रीपासूंन पुण्यात पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. हवामान विभागाने पावसाचा रेड अलर्ट जारी केला असून नागरिकांनी सतर्क राहण्याच्या सूचना केल्या आहेत. पुढील काही तासांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पुण्याला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे. सतत सुरू असणाऱ्या पावसामुळे बुधवारी पहाटे धरणातून पाणी सोडण्यात आले होते. सकाळी धरणातून ९ हजार क्युसेकने पाणी सोडण्यात आले होते. आज पहाटे या विसर्गात वाढ कारण्यात आली आहे. खडकवासला धरणातून तब्बल ३५,५७४ हजार क्युसेकने विसर्ग वाढवण्यात आला आहे, अशी माहिती कार्यकारी अभियंता खडकवासला पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.
खडकवासला धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे सिंहगड रस्त्यावरील काही सोसायट्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. काही इमारतीचा पहिला मजला पाण्याखाली गेला आहे. भर पाण्यात येथील नागरिकांना रात्र जागून काढावी लागली आहे. येथील एकता नगर परिसरात नदीचे पाणी घुसले आहे. तर सहा सोसायट्यांमध्ये पाणी घुसले आहे. तब्बल २०० नागरिक येथे अडकले असून महापालिका , पोलीस गायब असल्याने व मदतीसाठी कोणतीही यंत्रणा नअसल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. नागरिकांना पूर्व सूचना दिली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे.
खडकवासला धारणातून विसर्ग वाढवल्याने नदी पात्रातून मोठ्या प्रमाणात पाणी वाढले आहे. भिडे पूल पाण्याखाली गेला असून हा मार्ग व नदी पत्रातील वाहतूक ही मुख्य मार्गावरून वळवण्यात आली आहे. नागरिकांनी नदी पात्रा शेजारी जाऊ नये असे व सतर्क राहावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
संबंधित बातम्या