Maharashtra weather : गुढीपाडव्याच्या शोभायात्रांवर पावसाचे सावट; राज्यात पावसाचा इशारा
Maharashtra Weather : राज्यात आज गुढीपाडव्याची धामधूम असणार आहे. अनेक शहरात आज शोभा यात्रा निघणार आहेत. मात्र, या शोभा यात्रांवर पावसाचे संकट आहे. हवामान खात्याने आज देखील पावसाचा अंदाज दिला आहे.
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. मंगळवारी मुंबई आणि उपनगरात पावसाने थैमान घातले होते. आज देखील राज्याच्या अनेक भागात हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे. यामुळे गुढीपाडवा शोभायात्रांवर पावसाचे सावट आहे.
ट्रेंडिंग न्यूज
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार आज मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह हलक्या पावसाच्या सरींची शक्यता आहे. अरबी समुद्रातील आर्द्रतेने तसेच पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हा पाऊस होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. आज सकाळी मुंबईतील अनेक ठिकाणच्या तापमानात घट झाल्याचे पाहायला मिळाले. तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण होते.
राज्यात या आठवड्यात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबईसह, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी येथे गुरुवारपर्यंत हलक्या सरींची शक्यता आहे, तर सिंधुदुर्गात आज, बुधवारी पाऊस पडू शकेल. धुळे, नंदुरबार, सोलापूर, परभणी, हिंगोली, नांदेड, लातूर, उस्मानाबाद, अमरावती, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर येथे शुक्रवार आणि शनिवारसाठी यलो अॅलर्ट देण्यात आला आहे.
गुरुवारपर्यंत हलक्या सरी, तर त्यानंतर विजा आणि मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. नाशिक, अकोला, बुलडाणा, वर्धा, वाशिम, यवतमाळ येथे शनिवारी विजांसह पाऊस पडू शकेल. तोपर्यंत हलक्या सरींचा अंदाज आहे. जळगाव, अहमदनगर, पुणे येथेही पुढील चार दिवसांमध्ये अधूनमधून पाऊस पडू शकतो.