Pune Rain : पुण्यात धुवाँधार! पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप, अनेक सोसायटींमध्ये शिरलं पाणी-rain alert heavy rainfall lashes in mumbai thane pune area roads look like rivers in pune ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Rain : पुण्यात धुवाँधार! पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप, अनेक सोसायटींमध्ये शिरलं पाणी

Pune Rain : पुण्यात धुवाँधार! पावसाने रस्त्यांना नदीचं स्वरूप, अनेक सोसायटींमध्ये शिरलं पाणी

Sep 25, 2024 10:13 PM IST

Weather Update : मुंबई, पुणे, ठाण्यासह राज्यातील अनेक भागाला आज जोरदार पावसाने झोडपून काढले. पुण्यात ३ तासात १२४ मिलीमीटर पावसाची नोंद झाल्याने रस्त्यांना नद्यांचे रुप आले आहे.

पुण्यात जोरदार पावसाने रस्त्यांना तळ्याचं रुप
पुण्यात जोरदार पावसाने रस्त्यांना तळ्याचं रुप

राज्यातील अनेक जिल्ह्यांना आज जोरदार पावसाने झोडपून काढले. जोरदार पावसाने मुंबई-पुण्यातील रस्त्यांना नद्यांचे स्वरुप आले आहे.आज(बुधवार) मुंबई तसेच उपनगरात जोरदार पाऊस बरसला. मुंबईसह ठाणे, पुण्याला देखील पावसाने झोडपलं आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे. पुणे शहरातील मुख्य भागात अवघ्या तीन तासात एकूण १२४ मिलिमीटर पावसाची नोंद झाल्याचे पुणे हवामान विभागाने सांगितले आहे.

CTA icon

तुमच्या शहरातील हवामान जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा

पुण्याच्या हिंजवडी आयटी पार्कमध्ये अभूतपूर्व वाहतूक कोंडी झाली असून भूमकर चौकात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. एक किलोमीटर अंतर कापण्यासाठी तासन तास वेळ लागत आहे.

पुण्यात सलग तिसऱ्या दिवशी पाऊस -

पुण्यात आज सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पावसाने हजेरी लावली. बुधवारी सकाळपासून ढगाळ वातावरण होते. दुपारनंतर पावसाचा जोर वाढला.जोरदार पाऊस बरसल्याने शहरातील अनेक भागात पाणी साचलं. अनेक रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं तर अनेक इमारती व सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं. रस्त्यावर कंबरे इतकं पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. अनेक भागात मोठी वाहतूक कोंडी झाली असून वाहने एकाच ठिकाणी अडकून पडली आहेत. फर्ग्युसन रस्ता, कृषी महाविद्यालय चौक, सिमला ऑफिस चौक, शिवाजीनगर मध्ये मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली आहे.

शहरात झाडपडीच्या घटना -

शहरातील हडपसर,भाजी मंडई,काळे बोराटे नगर, चर्चजवळ पौड रोड, कृष्णा हॉस्पिटल जवळ, कर्वेनगर, पेगासेस हेल्थ क्लब,दत्तवाडी, म्हसोबा नगर, औंध, कस्तुरबा वसाहत, वडगाव शेरी, महादेव नगर, हडपसर बस डेपो, धनकवडी, टेलिफोन एक्स्चेंज आदि ठिकाणी झाडे कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत.

अनेक भागात शिरले पावसाचे पाणी -

त्याचबरोबर गंज पेठ,एरंडवणा,हर्डिकर हॉस्पिटल जवळ, कोरेगाव पार्क येथे पावसाचे पाणी शिरले आहे.मुसळधार पावसामुळे शिवाजी रस्त्याला नदीचे स्वरूप आले आहे. पुणे उंड्री नगर परिसरामध्ये सोसायटीमध्ये पाणी शिरले आहे.

उजनी धरणातून ३१ हजार ६०० क्युसेक विसर्ग -

धरणाच्या पाणी पातळीमधील झपाट्याने होत असलेली वाढ व पाणलोट क्षेत्रामधील अति पर्जन्यमानामुळे आज संध्याकाळी उजनी व खडकवासला धरणातून विसर्ग वाढवण्यात आला आहे. उजनी धरणातून संध्याकाळी ७.३० वा. भीमा नदीत ३१ हजार ६०० क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात सुरू करण्यात आला आहे. परिस्थितीनुसार विसर्गात बदल करण्यात येईल. नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन कार्यकारी अभियंता, उजनी धरण व्यवस्थापन विभागाने केले आहे. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला. नदी पात्रातील साहित्य, वाहने, जनावरे, टपऱ्या, दुकाने इत्यादी तात्काळ हलविण्याच्या अनुषंगाने कार्यवाही करावी करण्यात आली आहे.

मुंबई व उपनगरात जोरदार पाऊस -

मुंबई शहर तसेच पूर्व उपनगरातील मुलुंड, भांडुप, नाहूर, कांजूर, विक्रोळी, घाटकोपर या भागात जोरदार पाऊस बरसत आहे. ठाण्यातही जोरदार पावसाने हजेरी लावली. ठाणे, पनवेल, नवी मुंबईत सर्वच भागात पावसाने हजेरी लावली आहे.

Whats_app_banner