Mumbai Local Train Mega Block : गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुंबईतील अनेक ठिकाणी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळं मुंबईकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यातच आता भारतीय रेल्वेने मुंबईतील हार्बर, सेन्ट्रल आणि पश्चिम रेल्वे लाईनवर मेगाब्लॉक घेण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या म्हणजेच रविवारी या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घेण्यात येणार असून त्यामुळं सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. रेल्वे रुळांची देखभाल आणि दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार असून काही लोकल रद्द करण्यात आल्या आहे. तसेच काही लोकल गाड्या उशीराने धावणार असल्याची माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतील मध्य रेल्वेमार्गावरील सीएसएमटी ते विद्याविहार दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सर्व अप आणि डाउन लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळवण्यात येणार आहे. याशिवाय काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल ते वाशी दरम्यान अप आणि डाउन मार्गावर सकाळी ११.०४ ते दुपारी ४.०५ वाजता मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं सीएसटी-पनवेल, ठाणे ते पनवेल, ठाणे ते नेरुळ या मार्गावरील अप-डाउन लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहे. याशिवाय सीएसएमटी ते विद्याविहार आणि ठाणे ते वाशी दरम्यान रेल्वे रद्द राहणार आहे.
मुंबईतील पश्चिम रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान अप आणि डाउन धीम्या मार्गावर सकाळी १० ते दुपारी ३ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. त्यामुळं धीम्या मार्गावरील सर्व लोकल फेऱ्या जलद मार्गावर वळविण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. तसेच या मार्गावरील काही लोकल गाड्या रद्द करण्यात येणार असून काही रेल्वे उशीराने धावणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळं आता सुट्टीच्या दिवशी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना मोठा मनस्ताप होण्याची शक्यता आहे. परिणामी मुंबईतील सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.