पुणे : मुंबईकडून पुण्याच्या दिशेने येणारी रेल्वे वाहतूक आज ( दि. १८ मार्च) दुपारी तब्बल दोन तासासाठी विस्कळीत झाली होती. अचानकपणे झालेल्या या तांत्रिक बिघाडामुळे तब्बल ६ मेल एक्सप्रेस आणि ३ लोकल रेल्वेगाड्यांना उशीर झाला होता. दरम्यान रेल्वे गाड्यांना उशीर झाल्याने प्रवाशांना दोन तास ताटकळत बसावे लागले.
मध्य रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, आज दुपारी साधारण चार वाजण्याच्या सुमारास लोणावळा ते मळवली दरम्यान रेल्वे मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटली होती. त्यामुळे पुण्याकडे येणाऱ्या अनेक रेल्वे गाड्यांना उशीर झाला होता. यामध्ये हैद्राबाद एक्सप्रेस, कोणार्क एक्सप्रेस यासारख्या लांब पल्ल्याच्या गाड्या लोणावळा रेल्वे स्थानक येथे खोळंबल्या होत्या, तसेच पुणे आणि मुंबई दरम्यान ची लोकल रेल्वे वाहतूक सेवा ठप्प झाली होती. मात्र मध्य रेल्वे'च्या कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखवत त्वरित ही तांत्रिक अडचण दूर केली आणि रेल्वे सेवा पुन्हा एकदा सुरळीत झाली.
रेल्वे प्रवासी संघाच्या अध्यक्षा हर्षा शहा म्हणाल्या, “ आज झालेली घटना ही लोणावळा ते मळवली स्थानक दरम्यान डाऊनलाईन येथे घडली. या वेळेत मोठ्या प्रमाणात लोकल तसेच लांब पल्ल्याच्या गाड्यांची वाहतूक सुरू असते. मात्र या तांत्रिक बिघाडामुळे अनेक गाड्यांना उशीर झाल्याने, प्रवाशांना मानसिक त्रास सहन करावा लागला.”
याबाबत रेल्वेचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक डॉ. मिलींद हिरवे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, कामशेत मळवली दरम्यान ओव्हर हेड वायर तुटल्याचे लोको पायलटला दिसले. यानंतर तत्काळ या मार्गावर ब्लॉक जाहीर करण्यात आला. या मार्गावरील गाड्यांची वाहतूक थांबविण्यात आली. यामुळे ३ लोकल आणि ६ मेल गाड्या खोळंबल्या होत्या. याची माहिती मिळताच तातडीने दुरूस्तीचे काम हाती घेण्यात आले. थोड्याच वेळात हा बिघाड दुरुस्त करण्यात आला. दरम्यान, ही वायर कशामुळे तुटली, यासंदर्भात तपास सुरू आहे. प्रवाशांना झालेल्या त्रासाबद्दल आम्ही क्षमस्व आहोत.
संबंधित बातम्या