Ahmednagar Name Change : अहमदनगर जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदिल दाखवल्याने तसेच नामांतरास रेल्वे विभागाची कोणतीही हरकत नसल्याचे पत्र प्रशासनाला दिल्याने जिल्ह्याच्या नामांतराचा मार्ग आता सुकर झाला झाला आहे, अशी माहिती राज्याचे महसूल मंत्री तसेच जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात भाषण करताना अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर (Ahilyanagar) करण्यात येणार असल्याची घोषणा केली होती. यानंतर अहमदनगर जिल्ह्याचे नाव 'अहिल्यानगर' करण्याचा ठराव महापालिकेत मंजूर करण्यात आला. महापालिकेनंतर आता जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यास केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने परवानगी दिल्यानं नामांतराचा मार्ग सुकर झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्याला पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव देण्याची मागणी गेल्या अनेक वर्षापासून होत आहे. यानंतर गेल्यावर्षी महायुती सरकारने अहमदनगर जिल्ह्याचे नाव अहिल्यानगर करण्याचा निर्णय घेतला. नामांतराच्या बाबतीतील सर्व प्रक्रिया ही केंद्र सरकारच्या अखत्यारीत असल्याने जिल्ह्याशी निगडित प्रत्येक विभागाची ना हरकत आवश्यक असते. केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नामांतराच्या बाबतीत हरकत नसल्याचे पत्र जारी करुन अहिल्यानगर नावास मान्यता दिली आहे. या नावाचे कोणतेही रेल्वेस्थानक देशात नसल्याचेही त्यांनी आपल्या पत्रात नमूद केल्याने जिल्ह्याला अहिल्यानगर नाव देण्यातील पहिला टप्पा पूर्ण होत असल्याचे मंत्री विखे पाटील म्हणाले.
गेल्या अनेक वर्षांपासून अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलण्याची मागणी होत होती. त्याचबरोबर अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' करावे अशीही मागणी जोर धरत होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अहमदनगर जिल्ह्याचे नाव बदलून 'अहिल्यानगर' केले जाणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर याचा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत सादर करून नामांतराचा ठराव मंजूर करुन घेतला.
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अहमदनगरचे नामांतर 'पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर' असे करण्याची मागणी करत याचा पाठपुरावा केला होता. दरम्यान, गेल्यावर्षी चौंडी येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या २९८ व्या जयंती सोहळ्यात त्यांनी मुख्यमंत्री व उपमुख्यांच्या उपस्थितीत पुन्हा विनंती केल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्ह्याचे नामांतर अहिल्यानंतर असे करण्याची घोषणा केली.