मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  नवी मुंबईतील उलवे येथे सुरू होणार रेल्वेचा एकता मॉल, काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

नवी मुंबईतील उलवे येथे सुरू होणार रेल्वेचा एकता मॉल, काय आहेत प्रकल्पाची वैशिष्ट्ये?

Shrikant Ashok Londhe HT Marathi
Mar 13, 2024 08:58 AM IST

Railway Ekta Mall : केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे

नवी मुंबईतील उलवे येथे स्थापन होणार रेल्वेचा एकता मॉल
नवी मुंबईतील उलवे येथे स्थापन होणार रेल्वेचा एकता मॉल

नवनवीन योजनांच्या माध्यमातून देशातील सर्वसामान्यांचा सातत्याने विकास होत असून आपण विकसित भारताच्या दिशेने अग्रेसर होत आहोत. आज ८५ हजार कोटींहून अधिक किमतीच्या प्रकल्पांचे भूमिपूजन आणि लोकार्पण होत असून रेल्वेला आधुनिक बनवून देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले

पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मगंळवारी दूरदृश्य प्रणालीद्वारे ‘अहमदाबाद-मुंबई वंदे भारत एक्सप्रेस’ च्या शुभारंभासह रेल्वेच्या विविध उपक्रमांची पायाभरणी तसेच लोकार्पण करण्यात आले. 

यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले, २०२४ या वर्षात सुमारे ११ लाख कोटींहून अधिक योजनांचे भूमिपूजन अथवा उद्घाटन झाले असून विकासाची ही गती कमी होऊ दिली जाणार नाही. मागील काही वर्षात रेल्वे अपघातांचे प्रमाण कमी झाले असून वीजेवर चालणाऱ्या रेल्वेंची संख्या वाढली आहे. वंदे भारत एक्सप्रेसची संख्या वाढून विस्तार देखील होत आहे. रेल्वे स्थानकांचा कायापालट होत आहे. भारतातील सेमी हायस्पीड रेल्वेची मागणी इतर देशात वाढून भारतातील रेल्वेच्या कारखान्यांना अधिक काम मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एकता मॉलच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होणार असून तरुणांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

काय आहे एकता मॉल प्रकल्प -

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यात एकता मॉल स्थापन करण्याची योजना जाहीर केली आहे. त्यानुसार महाराष्ट्रात नवी मुंबईतील उलवे येथे एकता मॉल उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. राष्ट्रीय एकात्मता, ‘मेक इन इंडिया’, जिल्हा एक उत्पादन (ओडीओपी) संकल्पनेला चालना देण्यासाठी  तसेच ग्रामीण कारागिरांना त्यांची उत्पादने विकण्यास मदत करण्यासाठी हा मॉल उपयुक्त ठरणार आहे. सिडकोला यासाठी अंमलबजावणी एजन्सी म्हणून नेमण्यात आले.  नियोजन विभागाने उलवेमध्ये एकता मॉलसाठी भूखंड निश्चित केला आहे. हा भूखंड ५२०० चौरस मीटर एवढा आहे. देशभरातील ३६ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांची संस्कृती देशभरातील ३६ जिल्ह्यांमध्ये मॉलच्या माध्यमातून प्रदर्शित केली जाणार आहे. अठरा महिन्यात या मॉलचे बांधकाम पूर्ण करण्यात येणार आहे.

 

WhatsApp channel