Raigad News: रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वरमध्ये शनिवारी रात्री धक्कादायक घटना घडली. राहण्यासाठी रूम दिला नाही म्हणून दारुच्या नशेत असलेल्या पर्यटकांनी एका महिलेला स्कॉर्पिओखाली चिरडले. या घटनेत महिलेचा जागीच मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रात्री दीड वाजताच्या सुमारास घडली. याप्रकरणी स्थानिक पोलिसांनी पुण्यातील तीन पर्यटकांना अटक केली असून इतर सात जणांचा शोध सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पिंपरी- चिंचवड परिसरातील रहिवाशी असून ते श्रीवर्धनला फिरायला आले होते. दरम्यान, शनिवारी रात्री ते राहण्यासाठी रुम शोधण्यासाठी हरिहरेश्वर येथील अभि धामणस्कर यांच्या ‘ममता होम स्टे’ येथे चौकशीसाठी गेले, तिथे धामणस्कर यांनी आरोपींना रुम दाखवला. परंतु, रुमभाडे ठरवत असताना सर्वजण अति दारु प्यायल्याचे धामणस्कर यांच्या लक्षात आले. यामुळे धामणस्कर यांनी आरोपींना दुसऱ्या ठिकाणी रुम बघा, असे सांगितले. मात्र, यामुळे आरोपींना राग अनावर झाला. त्यातील एका जणाने धामणस्कर यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर तिथून पळून जात असताना आरोपींनी धामणस्कर यांची बहीण ज्योती धामणस्कर यांना कारखाली चिरडले. या घटनेत ज्योती यांचा रुग्णालयात नेण्यापूर्वीच मृत्यू झाला.
या घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन जणांना अटक केली असून इतर सात जणांचा शोध सुरू आहे. मात्र, या घटनेने परिसरात रुम भाड्याने देणाऱ्या हॉटेल मालकांच्या मनात भिती निर्माण झाली आहे.
पालघर जिल्ह्यातील पेल्हार पोलिसांनी वसई येथे पत्नीला दुसऱ्या व्यक्तीसोबत पाहून संतापलेल्या पतीने तिची गळा आवळून हत्या केली. त्यानंतर तिचा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये ठेवला. खुर्शीदा खातून चौधरी असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर, इस्माईल अब्दुल कयूम चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. जूनमध्ये लग्न झालेले हे जोडपे वसईच्या कमन परिसरात राहत होते. खुर्शीदा हिचे परिसरातील एका व्यक्तीसोबत विवाहबाह्य संबंध होते. घटनेच्या दिवशी कामावर गेलेला आरोपी लंब ब्रेक घेऊन घरी परतल्यानंतर त्याने आपल्या पत्नीला एका तरुणासोबत पाहिले. यामुळे त्यांच्यात जोरदार वाद झाला. या वादातून आरोपीने खुर्शीदाचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. तसेच त्याने पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी खोटे मृत्यू प्रमाणपत्र बनवण्यासाठी स्थानिक डॉक्टरांशी संपर्क साधला. परंतु, कोणीही मृत्यू प्रमाणपत्र देण्यास तयार झाले नाही. आरोपीच्या हालचालींवर संशय आल्याने शेजाऱ्यांनी स्थानिक पोलिसांना याबाबत माहिती दिली. त्यानंतर घटनास्थळी दाखल झालेल्या पोलिसांनी तपास केला असता खुर्शीदाचा मृतदेह घरातील फ्रीजमध्ये आढळला, जो १२ तासांपूर्वी ठेवण्यात आला होता. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील चौकशीला सुरूवात केली आहे.