Speeding Tempo Hits Laborers In Raigad: नाईट शिफ्टला जाणाऱ्या चार जणांना भरधाव टेम्पोने उडवले. या अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालकाला अटक केली आहे. सोमवारी (१० जून २०२४) रात्री ११.०० वाजताच्या सुमारास हा अपघात घडला.
मिळालेल्या माहितीनुसार, रवींद्र धोंडीबा ढेबे (वय, १९) आणि सचिन शिवाजी ढेबे (वय, १९) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणांची नावे आहेत. दरम्यान, मयत रवींद्र आणि सचिन हे संतोष ढेबे आणि निलेश ढेबे यांच्यासोबत नाईट शिफ्टसाठी रस्त्यावरून पायी चालत कामाला निघाले होते. त्याचवेळी पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या आयशर टेम्पोने त्यांना धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, रवींद्र आणि सचिनचा जागीच मृत्यू झाला. तर, संतोष आणि निलेश जखमी झाले. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या घटनेची माहिती मिळताच महाड पोलिसांनी घटनास्थळी धाव घऊन पंचनामा केला. पोलिसांनी जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. तर, मयत तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी महाशक्ती असोसिएशनच्या रुग्णवाहिकेने बिरवाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवले. याप्रकरणी पोलिसांनी टेम्पो चालक चंदनाबेन रामकुमारला (रा. उत्तर प्रदेश) टेम्पोसह ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे.
पुण्यात श्रीक्षेत्र भीमाशंकरकडे जाणाऱ्या रस्त्यावर एसटी आणि दुचाकीत भीषण धडक झाली. या अपघातात दुचाकीस्वारचा जागीच मृत्यू झाला. ओम लोहकरे (वय, १९) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. मयत संदीप लोहकरे तळेघर च्या दिशेने जात असताना एसटीने त्याच्या दुचाकीला धडक दिली. या घटनेची माहिती मिळताच घोडेगाव पोलीसांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी एसटी चालक नीलेश सखाराम भोर यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरुवात केली.