Raigad Accident : हृदयद्रावक..! भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू, ५ वर्षीय चिमुकली गंभीर-raigad accident car collided with scooty husband and wife died 5 year old girl injured ,महाराष्ट्र बातम्या
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Raigad Accident : हृदयद्रावक..! भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू, ५ वर्षीय चिमुकली गंभीर

Raigad Accident : हृदयद्रावक..! भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू, ५ वर्षीय चिमुकली गंभीर

Apr 07, 2024 07:53 PM IST

Raigad Accident : भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने स्कूटीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटीचा चक्काचूर होऊन पती-पत्नीचा मृत्यू झाला.

भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू (सांकेतिक छायाचित्र)
भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरील दाम्पत्याचा मृत्यू (सांकेतिक छायाचित्र)

रायगड जिल्ह्यातील उरण रेल्वे स्टेशनच्या बाहेर असलेल्या रस्त्यावर भरधाव कारच्या धडकेत स्कुटीवरून (car collided with scooty) जाणाऱ्या पती-पत्नीचा मृत्यू झाला. या अपघातात पाच वर्षीची चिमुकली गंभीररित्या जखमी झाली आहे. उरण रेल्वे स्टेशनच्या समोर असलेल्या प्रवेशद्वाराजवळच हा अपघात झाला. शनिवारी रात्रीच्या सुमारास हा अपघात झाला. या अपघातानंतर कारचालक रेल्वे पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ व मारहाण करत घटनास्थळावरून पसार झाल्याचे सांगितले जात आहे. 

भरधाव वेगाने आलेल्या क्रेटा कारने स्कूटीला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, स्कूटीचा चक्काचूर झाला. शनिवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. 

पवित्र बराल (वय ४०), पत्नी रश्मीता बराल (वय ३४) अशी मृतांची नावे आहेत. या अपघातात पाच वर्षीय मुलगी परी गंभीररीत्या जखमी झाली आहे. बराल दाम्पत्य उरण येथील रहिवासी होते. अपघातात जखमी पतीला उरणमधील सरकारी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात तर पत्नी रश्मीता बराल यांना एमजीएम हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. मात्र उपचारादरम्यान दोघांचाही  मृत्यू झाला. पाच वर्षीय परीला अनेक ठिकाणी फ्रॅक्चर झाले असून तिच्यावर बेलापुर येथील अपोलो रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

कारने स्कूटीला धडक दिल्यानंतर झालेला मोठा आवाज ऐकून उरण रेल्वे स्टेशनच्या परिसरात कर्तव्यावर असलेले रेल्वे पोलिस कर्मचारी अतुल चौहान तत्काळ रेल्वे स्टेशनच्या प्रवेशद्वारावर धावून आले. त्यांना समोरचे दृष्य पाहून धक्का बसला.

रेल्वे पोलिसाने सांगितले की, कारचा चालक जय चंद्रहास घरत (रा.म्हातवली) याने रस्त्यावर निपचित रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या कुटूंबाला हटवा म्हणून रेल्वे पोलिस कर्मचाऱ्यांशी वाद घालून त्यांची कॉलर पकडली. तसेच त्यांना मारहाण करत शिवीगाळही केली. बघ्यांची गर्दी होताच त्याने घटनास्थलावरून पोबारा केला. 

याप्रकरणी रेल्वे पोलीस कर्मचारी अतुल चौहान यांच्या तक्रारीनंतर उरण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान आरोपीला अद्यापही अटक करण्यात आली नसल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली आहे. 

Whats_app_banner
विभाग