Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी

Rahul Solapurkar : राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी

Feb 05, 2025 07:22 AM IST

Rahul Solapurkar : अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या आग्र्याहून सुटकेच्या प्रसंगाबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होत. यानंतर त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. त्यानंतर सोलापूरकर यांनी माफी मागितली आहे.

 राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी
राहुल सोलापूरकरांना उपरती! शिवाजी महाराजांवर केलेल्या व्यक्तव्यावर हात जोडून मागितली माफी

Rahul Solapurkar News : अभिनेता राहुल सोलापूरकर यांनी शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह विधान केले होते. शिवाजी महाराज लाच देऊन आग्र्याहून सुटून आले होते. ते मिठाईच्या पेटाऱ्यातून सुटले ही दंतकथा असल्याचे त्यांनी म्हटलं होतं. एवढेच नाही तर त्यावेळी पेटारे वगैरे काही नव्हतं, असं देखील राहुल सोलापूरकर एका पॉडकास्टमध्ये बोलताना म्हटले होते. यामुळे त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. त्यानंतर त्यांना उपरती झाली असून त्यानी माफी मागितली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा कोणताही हेतू नव्हता, तसा विचार कधीही मनात येणार नाही असं राहुल सोलापूरकर म्हणाले.

काय आहे प्रकरण ?

अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी एका पॉडकास्टमध्ये छत्रपती शिवाजी महाराज व त्यांची आग्र्याहून सुटका या बद्दल विधान केलं होतं. आग्र्याहून सुटका करताना शिवाजी महाराजांनी लाच देऊन स्वतःची सुटका केली होती असं वक्तव्य राहुल सोलापूरकर यांनी या पॉडकास्टमध्ये केलं होतं. त्यानंतर राज्यातील विविध संघटनांनी, इतिहास अभ्यासकांनी व राजकीय नेत्यांनी त्यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. जितेंद्र आव्हाड, अमोल मिटकरी, सचिन खरात यांनी त्यांच्यावर टीका केली होती. तर अनेक शिवप्रेमी संघटनांनी देखील राहुल सोलापूरकर यांच्या या व्यक्तव्याचा निषेध केला होता. वाढता वाद बघून सोलपूरकर यांनी एक व्हिडिओ पोस्ट करत माफी मागितली आहे.

व्हिडिओ पोस्ट करत मागितली माफी

राहुल सोलापूरकर यांनी व्हिडिओ पोस्ट करत सर्वांची माफी मागीतली आहे. सोलापूरकार म्हणाले, दीड दोन महिन्यापूर्वी मी एक मुलाखत दिली होती. त्यात इतिहास आणि इतिहासातील रंजक गोष्टी कशा बनतात याबद्दल विधान केलं होतं. शिवाजी महाराजांची आग्र्याहून सुटका कशी झाली याबद्दल मी बोललो होतो. मी जे बोललो तसे काही संदर्भ काही इतिहासकारांनी लिहून ठेवले आहेत. पण माझ्या या पूर्ण मुलाखतीमधील ते दोन वाक्य वापरून काही लोकांनी वाद निर्माण केला. शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचं माझ्या मनातही येणार नाही, असे सोलापूरकर म्हणाले. मी बोलतांना लाच हा शब्द वापरला. या शब्दाबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो असे देखील ते म्हणाले. शिवाजी महाराजांनी साम, दाम, दंड, भेद या नितीनुसार काम केले आहे. त्यामुळे माझा त्यांचा अवमान करण्याचा हेतु नव्हता असे राहुल सोलापूरकर म्हणाले.

Whats_app_banner

संबंधित बातम्या

महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर