Rahul Narwekar Assembly Speaker : भाजपाचे आमदार राहुल नार्वेकर पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षपदावर विराजमान होणार आहेत. राहुल नार्वेकर (Rahul Narwekar ) यांनी आज (रविवार) सकाळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन अर्ज अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी अर्ज दाखल केला. आज दुपारी १२ वाजेपर्यंत अर्ज दाखल करण्याची मुदत होती. तोपर्यंत राहुल नार्वेकर यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्याने त्यांची विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे.
मागील दोन दिवसांपासून विधानसभेचे विशेष अधिवेशन सुरू असून त्यात नवनिर्वाचित आमदारांचा शपथविधी पार पडला. आज दुपारी १२ वाजेपर्यंत विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत होती. त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, एकनाथ शिंदे आणिभाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत राहुल नार्वेकर यांनी विधिमंडळ सचिवांकडे उमेदवारी अर्ज दाखल केला. दिलेल्या मुदतीत केवळ राहुल नार्वेकरांचा उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने उद्या (९ डिसेंबर) राहुल नार्वेकर यांच्या नावाची औपचारिक घोषणा होणार आहे.
राहुल नार्वेकर हे भाजपचे कुलाबा मतदारसंघातील आमदार आहेत. राहुल नार्वेकर हे पेशाने वकील आहेत. त्यांनी अनेक शैक्षणिक, सामाजिक आणि सहकारी संस्थांसाठी वकील काम केलं आहे. अनेक संस्थांचे कायदेशीर सल्लागार म्हणून ते काम करायचे. मुंबई महापालिका तसंच इतर विषयांच्या संदर्भात दाखल याचिकेवर शिवसेनेची बाजू मांडण्याचं काम राहुल नार्वेकर करत असत. शिवसेनेचे प्रवक्ते म्हणूनही इंग्रजी टीव्ही चॅनलवर त्यांनी पक्षाची बाजू मांडली आहे.
२०२२ साली वयाच्या ४५ व्या वर्षी ते विधानसभा अध्यक्ष बनणारे पहिलेच तरुण अध्यक्ष होते. नार्वेकर हे कायद्याचे पदधीवर असून त्यांनी बऱ्याच संस्थांमध्ये कायदेशीर सल्लागार म्हणूनही काम केले आहे. राहुल नार्वेकरांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात शिवसेनेतून झाली, त्यानंतर ते राष्ट्रवादीत गेले आणि सध्या ते भाजपात आहेत. राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते रामराजे नाईक निंबाळकर यांचे ते जावई आहेत.एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नवं सरकार स्थापन झाल्यानंतर राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षपदावर निवड झाली होती. शिवसेना-राष्ट्रवादीतील फुटीनंतर राहुल नार्वेकरांनी विधानसभा अध्यक्ष म्हणून आमदार अपात्रता प्रकरणावर सुनावणी केली होती. आता पुन्हा राहुल नार्वेकर विधानसभा अध्यक्ष बनणार आहेत.
राहुल नार्वेकर यांनी विधानसभा अध्यक्षपदी निवड निश्चित मानली जात आहे. आपला अर्ज दाखल केल्यानंतर त्यांनी विरोधी पक्षनेता निवडीबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. खरंतर विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला कमीत कमी२९ही आमदार निवडून आणता आलेले नाहीत. त्यामुळे विधानसभेचा विरोधी पक्षनेता पदासाठी एकही पक्ष पात्र नाही. पण तीनही पक्षांनी एकत्र मिळून निर्णय घेतला तर विरोधी पक्षनेतेपद महाविकास आघाडीच्या एका आमदाराला मिळू शकतं.
याबाबत राहुल नार्वेकर यांनी म्हटले की, विरोधकांनी माझ्यावर टीका करण्यापलीकडं काही केलं नाही. मी उद्यापासून विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी पार पाडेल,तेव्हा साथ लाभेल अशी आशा आहे. मी कोणताही पक्षपात न करता निर्णय घेणार. विधानसभेत विरोधी पक्षनेता कोण असेल यासंदर्भात विधानसभा अध्यक्षांचा अधिकार असतो. नियमात ज्या गोष्टी असतील त्याद्वारे गोष्टी होत असतात. माझ्याकडे गोष्टी आल्यास आम्ही विचार करुन निर्णय घेऊ.असं राहुल नार्वेकर म्हणाले.
संबंधित बातम्या