bharat jodo nyay yatra in Nashik : काँग्रेसची भारत जोडो न्याय यात्रा ही महाराष्ट्रात पोहचली आहे. मंगळवारी या यात्रेने नंदुरबार येथे प्रवेश केला. या ठिकाणी राहुल गांधी यांचा रोड शो आणि सभा झाली. यात राहुल गांधी यांनी सत्ताधाऱ्यांवर तोफ डागली. दरम्यान, ही यात्रा आज नाशिक जिल्ह्यात दाखल होणार असून मालेगाव येथे या यात्रेच्या स्वागताची जोरदार तयारी करण्यात आली आहे. त्यांच्या या यात्रेत इंडिया आणि महाविकास आघाडीतील नेते शरद पवार आणि संजय राऊत देखील सहभागी होणार असल्याची चर्चा आहे.
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांची भारत जोडो यात्राआज बुधवारी नाशिक जिल्ह्यातील मालेगाव येथे येणार आहे. या निमित्त काँग्रेसच्या नेत्यांनी या यात्रेच्या स्वगतासाठी जोरदार तयारी केली आहे. उद्या गुरुवारी चांदवड येथे राहुल गांधी यांची त्यांची सभा होणार आहे. तर नाशिक येथे पोहचल्यावर रोड शो आयोजित करण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्या या दौऱ्यात जेष्ठ नेते शरद पवार आणि शिवसेनेच्या ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत सहभागी होणार आहेत.
शरद पवार हे आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. निफाड तालुक्यात शेतकरी मेळाव्याला ते उपस्थित राहणार असून या मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. खासदार संजय राऊत हे देखील नाशिक दौऱ्यावर आहेत. ते सिन्नर तालुक्यात एका धार्मिक कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत त्यानंतर त्यांचा नाशिकमध्ये तीन दिवस मुक्काम असणार आहे. या दरम्यान ते राहुल गांधी यांच्या समवेत भारत जोडो यात्रेत सहभागी होणार आहेत. गुरुवारी चांदवड येथे राहुल गांधी यांची सभा झाल्यानंतर ते पिंपळगाव ओझर मार्गे नाशिक शहरात येणार आहेत.
राहुल गांधी यांचे शहरातील द्वारका चौफुली येथे स्वागत करण्यात येणार आहे. या साठी काँग्रेस कार्यकर्ते तयारीला लागले आहे. या नंतर राहुल गांधी यांचा जूने नाशिक दूध बाजार, गाडगे महाराज चौक ते शालिमार म्हणजेच इंदिरा गांधी चौक असा रोड शो करणार आहेत. शालिमार येथे त्यांची सभा होणार आहे. यानंतर ते त्र्यंबकेश्वर मंदिरात दर्शनासाठी जाणार आहे. यानंतर ही यात्रा पालघरच्या दिशेने जाणार आहे.
संबंधित बातम्या