Rahul Gandhi Bharat Jodo Nyay Yatra : मुंबईत शनिवारी राहुल गांधी यांच्या भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप झाला. यानंतर आज राहुल गांधी यांची शिवाजी पार्क येथे जाहीर सभा होणार आहे. या साठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. संध्याकाळी ५ वाजता ही सभा होणार असून या सभेसाठी इंडिया आघाडीचे बडे नेते उपस्थित राहणार आहे. शिवाजी पार्क येथून राहुल गांधी हे निवडणूकीचे रणशिंग फुंकणार आहेत. दरम्यान या पूर्वी गांधी हे सकाळी मणीभवन ते ऑगस्ट क्रांती मैदान दरम्यान, 'न्याय संकल्प' पदयात्रा काढणार आहेत.
राहुल गांधी यांच्या न्याय यात्रेचा शनिवारी मुंबईतील चैत्यभूमीवर समारोप झाला. यावेळी राहुल गांधी यांनी भारतीय संविधानाच्या प्रस्तावनेचे वाचन केले. तसेच चैत्यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली देखील वाहिली. यावेळी त्यांनी भाजपवर पुन्हा तोफ डागत टीका केली. त्यानंतर आज शिवाजी पार्क येथे राहुल गांधी यांच्या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, सभा सुरू होण्याआधी राहुल गांधी हे शिवतीर्थावर जाऊन बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.
राहुल गांधी यांच्या आजच्या सभेत ते लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहेत. या वेळी त्यांच्या सोबत इंडिया आघाडीतील बडे नेते सोबत राहणार आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, बिहार विधानसभा विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव, झारखंडचे मुख्यमंत्री चंपई सोरेन, ज्येष्ठ नेते फारुक अब्दुल्ला, उत्तर प्रदेश विधानसभा विरोधी पक्षनेते अखिलेश यादव, जेष्ठ नेत्या कल्पना सोरेन यांच्यासह इंडिया आघाडीचे १५ पेक्षा अधिक मित्र पक्षाचे नेते सहभागी होणार आहेत