महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवार अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील जागावाटपाचा वाद मिटलेला नाही. आता हा वाद थेट दिल्ली दरबारी पोहोचला आहे. राज्यात काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने दिल्लीतील CEC च्या बैठकीत विरोधी पक्षनेते राहुल गांधी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर कमालीचे नाराज झाले आहेत. मित्रपक्षांसोबत वाटाघाटी करण्यात राज्यातील नेते कमी पडल्यामुळे राहुल गांधी नाराज झाल्याची माहिती मिळत आहे. याबद्दल महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षनाना पटोले यांनी माहिती दिली.
काँग्रेसच्या निवडणूक कमिटीच्या बैठकीत (सीईसी) राहुल गांधींनी आपली नाराजी बोलून दाखवली आहे. महाविकास आघाडी झालेल्या जागावाटपाच्या चर्चांमध्ये राज्यातील नेत्यांनी वाटाघाटी व्यवस्थित केली नाही. तसेच राज्यात देण्यात आलेल्या ओबीसी उमेदवारांबाबतही राहुल गांधी नाराज असल्याचं बोललं जात आहे.
जागावाटपात योग्य पद्धतीने वाटाघाटी केल्या नसल्याने राहुल गांधी नाराज आहेत, अशी चर्चा आहे. यावर माध्यमांशी बोलताना नाना पटोले यांनी सांगितले की, काँग्रेस पक्षाला माध्यमांतून टार्गेट केले जात आहे. आमचे नेते राहुल गांधींचे बरोबर आहे की, महाराष्ट्रात काँग्रेसला जास्त जागा मिळाल्या पाहिजे. मेरिटच्या आधारावर विशेषकरून विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मुंबई या भागात काँग्रेसला जास्त जागा मिळायला हव्यात. पण, आघाडी धर्मामुळे जागावाटपाचा घोळ झाला आहे. देशातील तसेच राज्यातील सर्व समाजाच्या लोकांना प्रतिनिधित्व मिळावं, ही राहुल गांधींची अपेक्षा आहे. सगळ्यांना सत्तेचा वाटा मिळाला पाहिजे, ही भूमिका राहुल गांधींची आहे. त्या हिशोबाने आम्ही जास्तीत जास्त ओबीसी लोकांना तिकीट देण्याचा प्रयत्न केला आहे, असे नाना पटोले यांनी सांगितले.
महाआघाडीतील मित्र पक्षासोबत चर्चा करताना हा घोळ झाला.पण तिघांची आघाडी असल्याने तो घोळ झाल्याचे त्यांना आम्ही सांगितल्यावर त्यांचं समाधान झाल्याचं नाना पटोले म्हणाले.
दरम्यान या बैठकीत ओबीसीतील दुर्लक्षित जातींना उमेदवारांच्या यादीत स्थान द्या. ओबीसींच्या जागांवर विशेष लक्ष द्या. आपण जातीय जनगणना आणि ओबीसी मुद्यावर आक्रमक आहोत त्यामुळ त्यांना प्रतिनिधित्व मिळाल पाहिजे,अशा सुचना राहुल गांधी यांनी राज्यातील नेत्यांना दिल्या आहेत.
संबंधित बातम्या