Rahul Gandhi post about Balasaheb Thackeray : शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा १२ वा स्मृतीदिन आहे आहे. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त देशभरातले नेतेमंडळींनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुंबईतल्या शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या समाधीस्थळी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे यांनी शिवाजी पार्कयेथील बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. दरम्यान, महत्त्वाची बाब म्हणजे लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्याबाबत पोस्ट लिहून आदरांजली व्यक्त केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईत आले असताना त्यांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलं होतं की बाळासाहेब ठाकरेंसाठी दोन शब्द तरी राहुल गांधींकडून वदवून दाखवा. त्यामुळे राहुल गांधी यांची पोस्ट व्हायरल होत आहे.
शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांचे १७ नोव्हेंबर २०१२ रोजी मुंबईतील 'मातोश्री' या निवासस्थानी दीर्घ आजाराने निधन झाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राष्ट्रवादी-सपाचे अध्यक्ष शरद पवार, मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा वर्षा गायकवाड, शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आज श्रद्धांजली वाहिली.
काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनीही बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या १२ व्या पुण्यतिथीनिमित्त गांधी यांनी पोस्ट लिहून आदरांजली वाहिली. उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि संपूर्ण शिवसेना परिवाराबद्दल माझ्या संवेदना आहेत. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्याबद्दल राहुल यांनी सांगितलेल्या या दोन ओळी अत्यंत महत्त्वाच्या आहेत. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांनी राहुल गांधींना आव्हान दिलं होतं की आघाडीच्या सहकाऱ्यांना आव्हान देतो. हिंमत असेल तर युवराजच्या तोंडून बाळासाहेब ठाकरेंची थोडी स्तुती करून दाखवा. कॉंग्रेस हा असा पक्ष आहे ज्याचे ना धोरण आहे ना हेतू.
राहुल गांधी यांनी बाळासाहेब ठाकरेंबद्दल चांगलं बोलावं, असं आव्हानही अमित शहा यांनी दिलं होतं. २० नोव्हेंबरला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हिंगोलीत झालेल्या सभेत बोलताना अमित शहा म्हणाले की, उद्धव जी, हिंमत असेल तर राहुलबाबांना बाळासाहेबांबद्दल दोन चांगले शब्द बोलण्यास सांगा. यावर प्रत्युत्तर देताना प्रियांका गांधी म्हणाल्या होत्या की, मोदी नेहमीच शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नाव घेतात. होय, आमची विचारधारा वेगळी आहे. होय, आमची राजकीय विचारसरणी वेगळी आहे... पण शिवाजी महाराजांचा अपमान ना बाळासाहेब ठाकरे सहन करणार आहेत, ना कॉंग्रेसचा कोणताही नेता किंवा राहुल गांधी सहन करणार आहेत. '
राहुल गांधी यांनी पोस्ट करत लिहिलं की, बाळासाहेब ठाकरे यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे. यामुळे त्यांची आठवण येत आहे. माझे विचार आणि संवेदना उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे तसंच संपूर्ण शिवसेना कुटुंबासह आहेत. असे राहुल गांधी यांनी लिहून त्यांच्या भावना व्यक्त करत बाळासाहेब ठाकरे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. त्यामुळे आता त्यांच्या या पोस्टवर भाजप काय प्रतिक्रिया देणार या कडे सर्वांचे लक्ष लागून आहे.