Rahul Gandhi on swatantra veer savarkar : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या विरोधात आक्षेपार्ह व्यक्तव्य केल्याने त्यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दरम्यान, या प्रकरणी पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी राहुल गांधी यांना पुढील १९ ऑगस्ट रोजी या प्रकरणी न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. सात्यकी सावरकर यांनी ही तक्रार केली होती. दरम्यान, सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत आढळलेले तथ्य व विश्रामबाग पोलिसांचा तपासणी अहवाल प्रथमदर्शनी ग्राह्य धरून न्यायालयाने राहुल गांधी यांना कोर्टापुढे हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याविरोधात आक्षेपार्ह विधान केले होते. त्यांच्या या विधाना विरोधात सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांनी पुण्यातील कोर्टात दावा दाखल केला होता. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी तपासणी अहवाल कोर्टात सादर केला. या अहवालात राहुल गांधी यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांनी केलेल्या तक्रारीत तथ्य आढळले आहे. त्यामुळे या अहवालाच्या आधारे पुण्यातील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांनी राहुल गांधी यांना फौजदारी प्रक्रिया संहितेच्या (सीआरपीसी) कलम २०४ नुसार कार्यवाहीसाठी नोटीस बजावली असून पुढील तारखेला म्हणजेच १९ ऑगस्टला पुणे न्यायालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत.
राहुल गांधी यांनी लंडनमध्ये अनिवासी भारतीयांसमोर केलेल्या भाषणात सावरकर यांच्या बाबत आक्षेपार्ह विधान केले होते. या वरून देशात मोठा वाद झाला होता. या प्रकरणी सात्यकी सावरकर यांनी राहुल गांधी यांच्याविरोधात पुणे न्यायालयात मानहानीचा फौजदारी दावा दाखल केला. फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम २०२ नुसार तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, पोलिसांनी या प्रकरणी तपास न केल्याने त्यांना नोटिस देखील बजावण्यात आली होती.
त्यानंतर प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अक्षी जैन यांच्या समोर या प्रकरणाचा तपासणी अहवाल सादर करण्यात आला. राहुल गांधी यांच्या वक्तव्याबाबत सात्यकी सावरकर यांच्या तक्रारीत तथ्य आढळल्याचे या अहवालात आढळून आले आहे. त्यामुळे न्यायालयाने ‘सीआरपीसी’च्या कलम २०४ नुसार कार्यवाही सुरू केली आहे, त्यामुळे या प्रकरणी राहुल गांधी यांना १९ ऑगस्ट या पुढील तारखेला पुणे न्यायालयासमोर हजर राहण्याचा आदेश देण्यात आल्याचे सात्यकी सावरकर यांचे वकील ॲड. संग्राम कोल्हटकर यांनी सांगितले. दरम्यान, राहुल गांधी पुणे कोर्टात हजर राहणार का ? या कडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.