Rahul Gandhi in pandharpur Wari 2024 : अख्ख्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी वारकरी आषाढी वारीची चातकाप्रमाणे वाट पाहत असतो. आषाढीनिमित्त महाराष्ट्र कर्नाटक, तेलंगाणा, आंध्रप्रदेश राज्यांसह संपूर्ण देशभरातून वारकरी लाखो भाविक पंढरपुरात दाखल होत असतात. एकदा तरी वारी अनुभवावी अशी सर्वांची इच्छा असते. त्यातच आता आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन बडे राजकीय नेतेही वारीत सहभागी होणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पाठोपाठ आता काँग्रेसचे खासदार राहुल गांधी महाराष्ट्रात येऊन वारीत सहभागी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
पंढरीची वारी महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा सोहळा मानला जातो. या वारीत आता राहुल गांधीही सहभागी होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे.यंदा२९ जूनला संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीतून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. यावर्षीचे वेळापत्रक देवस्थान समितीने जाहीर केले आहे. त्याचबरोबर यंदा नेहमीपेक्षा जास्त वारकरी वारीत सहभागी होतील असा अंदाज आयोजकांना आहे. त्यातच आता शरद पवार आणि राहुल गांधी वारीत सहभागी होणार असल्याने मोठे शक्तीप्रदर्शन होण्याची शक्यता आहे.
१७ जुलैला आषाढी एकादशी आहे. त्यासाठी राज्यभरातून संतांच्या पालख्या पंढरपूरच्या दिशेने रवाना होत असतात.काँग्रेसने दिलेल्या माहितीनुसार, राहुल गांधी हे पंढरीच्या आषाढी वारीत सहभागी होण्याबाबत विचार करत आहेत. राज्यात येत्या तीन-चार महिन्यांमध्ये विधानसभेची निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी हे पंढरीच्या वारीत सहभागी झाल्यास काँग्रेस पक्षासाठी ते फायदेशीर ठरु शकते. राहुल गांधी यांनी यापूर्वी भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने हजारो किलोमीटरचे अंतर पायी चालून पार केले होते. त्यामुळे पंढरीच्या वारीत चालणे त्यांच्यासाठी सहजसोपी गोष्ट ठरु शकते. त्यामुळेया वारीत राहुल गांधी देखील चालताना दिसू शकतात.
राहुल गांधी १३ किंवा १४ जुलै रोजी पंढरपुरात येणारअसून विठुरायाचं दर्शन घेणारअसल्याची माहिती आहे. याबाबत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्याने दुजोरा दिला आहे. १७ जुलैला आषाढी एकादशी आहे. यासाठी १३ किंवा १४ जुलैला राहुल गांधी विठ्ठल मंदिरात दर्शन घेणार आहे. त्यांना पालखी सोहळ्याचा आनंद घ्यायचा आहे. पालखी माळशिरास येथे आल्यानंतर माळशिरस ते वेळापूर येथे ते वारीत सहभागी होण्याची शक्यता आहे.
यंदा शरद पवारही वारीत सहभागी होणार आहेत. बारामती ते इंदापूरच्या सणसरपर्यंतचे तब्बल १७ किलोमीटरचे अंतर शरद पवार पायी चालणार आहेत. संत तुकोबारायांच्या पालखी सोहळ्यात ७ जुलै रोजी ही मंडळी बारामती ते सणसर हे अंतर चालणार आहेत. शरद पवार आणि राहुल गांधी हे दोन बडे नेते वारीत सहभागी झाल्यास मोठे राजकीय शक्तीप्रदर्शन होऊ शकते.
संबंधित बातम्या