video : भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली वजनदार तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय? पाहा!
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  video : भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली वजनदार तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय? पाहा!

video : भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली वजनदार तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय? पाहा!

Nov 19, 2024 06:25 PM IST

Rahul gandhi on Ek hai to safe hai : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या ‘एक है तो सेफ है’ या घोषणेचा अर्थ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आज सांगितला.

भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय?
भर पत्रकार परिषदेत राहुल गांधी यांनी आणली तिजोरी; तिजोरीत नेमकं होतं काय?

Rahul Gandhi Marathi News : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या दिवशी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेत भारतीय जनता पक्ष व नरेंद्र मोदी यांच्यावर हल्ला चढवला. एक है तो सेफ है… या मोदींनी दिलेल्या घोषणेचा अर्थही त्यांनी यावेळी उलगडून सांगितला. त्यासाठी त्यांनी भर पत्रकार परिषदेत एक वजनदार तिजोरीच आणली होती.

राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत आणलेल्या तिजोरीवर मोदींची ‘एक है तो सेफ है…’ ही घोषणा लिहिण्यात आली होती. त्या तिजोरीत नरेंद्र मोदी आणि गौतम अदानी यांचे पोस्टर होते. तसंच, धारावीचेही पोस्टर होते. इंग्रजीत तिजोरीला 'सेफ' म्हटलं जातं. तोच धागा पकडून राहुल गांधी यांनी मोदींच्या घोषणेचा अर्थ सांगितला. नरेंद्र मोदी आणि अदानी हे 'एक' राहिले तर 'सेफ' त्यांच्याकडं राहील, असं राहुल गांधी म्हणाले.

'नरेंद्र मोदी यांनी दिलेली घोषणा अत्यंत योग्य आहे. मोदी आणि अदानी एकत्र राहिले तर ते दोघेही सेफ राहतील. असुरक्षित राहणार धारावी आणि सर्वसामान्य जनता, असा टोला राहुल गांधी यांनी हाणला.

'महाराष्ट्रातील निवडणूक ही विचारधारेची निवडणूक आहे. एक-दोन अब्जाधीश आणि गरिबांच्या मधील हा निवडणूक आहे. अब्जाधीशांना मुंबईतील जमीन हवी आहे. मुंबईतील अंदाजे एक लाख कोटी रुपये किंमतीची जमीन एका अब्जाधीशाला देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप राहुल गांधी यांनी केला.

धारावी पुनर्विकास प्रकल्पातील (डीआरपी) निविदा प्रक्रिया अब्जाधीशांच्या हिताचं रक्षण करण्यासाठी राबवण्यात आली आहे. केंद्र सरकारच्या मर्जीतल्या आणि आवडीच्या उद्योगपतींना प्रकल्प मिळावेत यासाठी केंद्रीय यंत्रणा इतर उद्योगपतींवर दबाव टाकत आहेत. उद्योगपतींचं हित जपण्यासाठी गरीब धारावीवासीयांच्या हिताकडं दुर्लक्ष करण्यात आलं आहे. गोरगरीब रहिवाशांना हक्काची जमीन परत मिळावी, यासाठी महाविकास आघाडी आणि काँग्रेस प्रयत्न करणार आहे, असं राहुल गांधी म्हणाले.

महाराष्ट्रातील प्रकल्प इतर राज्यांकडं

महाराष्ट्रातील तरुणाला रोजगाराची गरज असताना महाराष्ट्रात येणारे किमान ९ मोठे प्रकल्प इतर राज्यांकडे वळविण्यात आले आहेत. सात लाख कोटी रुपयांच्या या प्रकल्पांमध्ये १.६३ लाख कोटी रुपयांचे आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र, ३,००० कोटी रुपयांचा गेल पेट्रोकेमिकल प्रकल्प, १.१ लाख कोटी रुपयांचा टाटा विमान प्रकल्प आणि २ लाख कोटी रुपयांचा आयफोन निर्मिती प्रकल्प यांचा समावेश आहे. भाजप आणि अदानी समूहानं या आरोपांवर अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही, याकडं राहुल गांधी यांनी लक्ष वेधलं.

Whats_app_banner