Rahul Gandhi on Devendra Fadnavis : राहुल गांधी यांच्या हातात लाल रंगाचे संविधान आहे. ते प्रत्येक सभांमधून आपल्या हातात लाल रंगाचे संविधान लोकांना दाखवत असतात. सभेत त्यांच्या आजूबाजूला शहरी नक्षलवादी बसलेले असतात. राहुल गांधी कट्टर डाव्या विचारांकडे झुकलेले आहेत, याचेच हे निदर्शक आहे, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. फडणवीसांच्या या टीकेला काँग्रेसचे ज्येष्ठ नेते व लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
देवेंद्र फडणवीसांनी म्हटले होते की, भारत जोडो असा सोशल मीडिया ग्रुप तयार करण्यात आलाय. ज्यात अनेक संघटना सामील असून त्या संघटना डाव्या विचाराच्या आहेत. त्यांची ध्येयधोरणे पाहता ती अराजकता पसरवणारी यंत्रणा आहे. राहुल गांधी एक पुस्तक दाखवतात. संविधानाचा सन्मान सर्वांनीच केला पाहिजे,मग लाल संविधान कशासाठी? लाल संविधान किंवा लाल पुस्तक दाखवून कोणाला इशारा देत आहेत? तुम्ही या माध्यमातून अराजकता पसरवत आहात. भारत जोडोच्या माध्यमातून अराजकता पसरवली जात आहे. अर्बन नक्षलवाद यापेक्षा वेगळा नाही, असं फडणवीस म्हणाले.
महाराष्ट्राच्या माजी भाजप मुख्यमंत्र्यांच्या मते बाबासाहेबांचे संविधान दाखवून जात जनगणनेसाठी आवाज उठवणे ही नक्षलवादी संकल्पना आहे. भाजपची ही विचारसरणी म्हणजे महाराष्ट्राच्या राज्यघटनेचे निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान असल्याचे प्रत्युत्तर राहुल गांधी यांनी दिले आहे. राहुल गांधी म्हणाले,लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने संविधानासाठी लढून महाविकास आघाडीला मोठा विजय मिळवून दिला. महाराष्ट्रातील जनता भाजपकडून वारंवार होत असलेला बाबासाहेबांचा अपमान सहन करणार नाहीत. महाराष्ट्रातील लोक काँग्रेस आणि महाविकास आघाडीसोबत संविधानावरील प्रत्येक हल्ल्याला पूर्ण ताकदीने उत्तर देऊन त्याचे रक्षण करतील. भाजपचे असे सर्व लाजिरवाणे प्रयत्न अयशस्वी होतील,जात जनगणना होईल.
माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी फडणवीसांना प्रत्युत्तर देताना म्हटले की, पवित्र संविधानाला रंगामध्ये अडकवण्याचा केविलवाणा प्रयत्न देवेंद्र फडणवीस करत आहेत, हे दुर्दैवी आहे. राहुल गांधींच्या हाती असलेल्या ज्या लाल संविधानाचा फडणवीसांनी उल्लेख केला तेच संविधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्कालीन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेट दिली होती. यावर फडणवीसांचे काय मत आहे, असा सवालही चव्हाण यांनी केला आहे.