Pune Ratnagiri Highway : गेल्या तीन ते चार दिवसांपासून कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्यात वीजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस होत आहे. त्यामुळं कोकणातील अनेक नद्यांना पूर आला आहे. तसेच रायगडच्या इर्शाळवाडीत भीषण भूस्खलन झाल्याच्या घटनेत १६ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यातच आता कोकणाला पश्चिम महाराष्ट्राशी जोडणारा रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच रघुवीर घाटात पर्यटनासाठीही बंदी घालण्यात आली आहे. खेड तालुक्यातील रघुवीर घाट हा पावसाळ्यातील पर्यटन स्थळ म्हणून ओळखला जातो. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या संख्येने रघुवीर घाटावर गर्दी करत असतात. त्यामुळं पाऊस सुरू असताना कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट वाहतुकीसाठी बंद करण्याचा निर्णय खेडच्या तहसीलदारांनी घेतला आहे.
घाटावर सातत्याने पर्यटक येत असतात, त्यामुळं त्यांच्या सुरक्षेसाठीच हा निर्णय घेण्यात आल्याचंही प्रशासनाकडून सांगण्यात आलं आहे. रघुवीर घाट हा डोंगर भागालगत असल्याने तिथं दरड कोसळणे किंवा भूस्खलन होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच हवामान खात्याने कोकणात पुढील पाच दिवस अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्यामुळं कोकणाला पुण्याशी जोडणाऱ्या मार्गावर कोणताही दुर्घटना घडू नये, यासाठी रघुवीर घाट बंद करण्यात आला आहे. तसेच पर्यटकांना घाटावर जाण्यासाठी मज्जाव करण्यात आला आहे.
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून कोकणात होत असलेल्या मुसळधार पावसामुळं कोकणातील अनेक नद्यांना पूर आला आहे. वशिष्ठी, सावित्री आणि पाताळगंगा नद्यांना पूर आला आहे. त्यामुळं खेड आणि चिपळूण तालुक्यांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळं नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही दिवस कोकणात अतिवृष्टीची शक्यता असल्याने नागरिकांना कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. तसेच पर्यटकांनाही धोकादायक ठिकाणी जाणं टाळण्याच्या सूचना करण्यात येत आहे.
संबंधित बातम्या