मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  रॅकून प्राण्याची पालघरमधून सुटका; ६० दिवस कंटेनरमधून अन्नपाण्यावाचून केला अमेरिका ते भारत प्रवास

रॅकून प्राण्याची पालघरमधून सुटका; ६० दिवस कंटेनरमधून अन्नपाण्यावाचून केला अमेरिका ते भारत प्रवास

Jan 01, 2024 09:17 PM IST

मालवाहू समुद्री जहाजात तब्बल ६० दिवस प्रवास करून अमेरिकेतून भारतात आलेल्या रॅकून प्राण्याची पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सुटका करण्यात आली.

Raccoon rescued from shipping container in Mumbai
Raccoon rescued from shipping container in Mumbai

अमेरिकेतून भारतात आलेल्या एका मालवाहू जहाजाच्या कंटेनरमध्ये आलेल्या रॅकून प्राण्याची पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात सुटका करण्यात आली आहे. हा प्राणी मालवाहू जहाजाच्या बंदिस्त कंटेनरमध्ये बसून तब्बल ६० दिवस प्रवास करून अमेरिकेहून भारतात आला होता. ६० दिवसांच्या या समुद्री प्रवासात हा प्राणी अन्नपाण्याविना होता, अशी माहिती पालघरच्या वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. 

नवी मुंबईतील उरण येथील जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट येथे अमेरिकेच्या जहाजातून उतरवलेलं एक कंटेनर पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात पोहचवण्यात आलं. या कंटेरनमधून सामान रिकामं करत असताना कंटेनरच्या मागच्या बाजुला सामानाच्या आड रॅकून हा प्राणी लपून बसला असल्याचे कर्मचाऱ्यांना दिसले. त्यानंतर वन विभाग आणि वन्य प्राण्यांची सुटका करणाऱ्या ‘रेस्किंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर’ या संस्थेच्या टिमला पाचारण करण्यात आले. गेल्या ५ नोव्हेंबर २०२३ रोजी अमेरिकेतून जहाजाद्वारे सामानाने भरलेले हे कंटेनर निघाले होते. तेव्हापासून हा प्राणी या बंदिस्त कंटेनरमध्ये बसून होता. गेले ६० दिवस अन्नपाणी मिळाले नसल्याने या प्राण्याच्या शरीराचे निर्जलीकरण झाले होते. अन्नपाण्यावाचून उपाशी असल्याने अशक्त झाला होता, असं या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘आम्ही प्राण्याची तपासणी करू आणि त्याच्या पुनर्वसनाची प्रक्रिया सुरू करू. शिवाय संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून रॅकून या प्राण्याला त्याच्या मूळ देशात परत पाठवण्याचा प्रयत्न करू’ अशी माहिती पालघर वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन पवन शर्मा यांनी दिली. शर्मा हे रेस्किंग असोसिएशन फॉर वाइल्डलाइफ वेल्फेअर (RAWW)चे संस्थापक आणि अध्यक्ष असून वन विभागाचे मानद वन्यजीव वॉर्डन आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

रॅकून हा सस्तन प्राणी मुख्यतः उत्तर अमेरिकेत आढळतो. हा प्राणी अतिशय हुशार असून जंगलात मांस, पक्ष्यांची अंडी आणि वनस्पती खातो. रॅकून हा प्राणी बंदिवासात २० वर्षापर्यंत जगू शकतो. मात्र खुल्या जंगलात कोल्हे, लांडगे, गरुड यांसारखे मांसाहारी प्राणी, पक्षी त्याची शिकार करत असल्याने रॅकून प्राण्याचं जंगलातलं सरासरी आयुर्मान ५ वर्ष असतं.

WhatsApp channel
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर