Sinhagad Fort : पुण्यात गेल्या महिन्यात झालेल्या पावसामुळे ३० जुलै रोजी सिंहगडावर मोठी दरड कोसळली होती. या नंतर हा गड पर्यटकांसाठी बंद करण्यात आला होता. सिंहगड मार्गावरील दरड हटवण्याचे काम अंतिम टप्यात आले असून हा किल्ला उद्या बुधवार (दि. ७)पासून पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार आहे. सध्या घाट रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू आहे. ते उद्या संध्याकाळपर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. काही निर्बंधांसह गडावरील पर्यटन पुन्हा सुरू करण्यात येईल, असे सहाय्यक वनसंरक्षक दीपक पवार यांनी सांगितले.
किल्ले सिंहगड परिसरात मोठ्या प्रमाणात पाऊस सुरू आहे. सध्या या पावसाची तीव्रता कमी हली आहे. मात्र, गेल्या महिन्यात गड परिसरात तुफान पाऊस झाला. या पावसामुळे सिंहगड परिसरात दरड प्रवण क्षेत्रात दरड कोसळली. दरम्यान, या घटणेपूर्वी वन व्यवस्थापन समितीने दरड कोसळण्याच्या शक्यता असून जास्त वेळ थांबू नये असे सूचना फलक देखील लावले होते. त्याच्या दुसऱ्याच दिवशी या ठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे गडावरील वाहनतळाच्या एक किलोमीटर आधी बटाटा पॉइंटजवळ मोठी दरड कोसळली. दगड आणि मातीचा मोठा ढीग रस्त्यावर आल्याने हा रस्ता बंद झाला होता.
सकाळी गडावर जाणाऱ्या नागरिकांना या मार्गावर दरड कोसळल्याचे दिसले. त्यांनी याची माहिती वनविभाग व प्रशासनाला दिल्यावर वनविभागाचे अधिकारी आणि स्थानिक प्रशासानाचे अधिकाऱ्यांनी वनव्यवस्थापन समितीतर्फे दरड हटविण्याचे काम सुरू केले. जेसिबीच्या साह्याने गेल्या आठवड्यापासून येथील दरड हटवली जात होती. यामुळे पर्यटनासाठी हा किल्ला बंद होता.
वनविभागाने तातडीने येथील मातीचा ढिगारा हटवण्यास सुरुवात केली होती. मात्र सततच्या पावसामुळे दरड हटवण्याच्या कामात विलंब होत होता. आता हे काम अंतिम टप्यात आले असून आज हे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे बुधवारपासून हा गड पर्यटकांसाठी पुन्हा खुला करण्यात येणार असल्याचे पवार यांनी सांगितले.
सध्या गड परिसरात पावसाचा जोर कमी झाला आहे. असे असले तरी मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे आणखी दरड कोसळण्याच्या घटना घडण्याची शक्यता आहे. त्यामुळे या गडावर पर्यटणासाठी जाताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.