Pune Water News : पुणेकर पित आहेत अशुद्ध पाणी! पाणी शुद्ध न करता थेट पोहोचतं घरी
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Pune Water News : पुणेकर पित आहेत अशुद्ध पाणी! पाणी शुद्ध न करता थेट पोहोचतं घरी

Pune Water News : पुणेकर पित आहेत अशुद्ध पाणी! पाणी शुद्ध न करता थेट पोहोचतं घरी

Feb 05, 2025 05:52 AM IST

Pune Water News : पुण्यात जीबीएसचा प्रादुर्भाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातील पाण्याच्या स्त्रोतांची तपासणी केली असता, अनेक ठिकाणचे नमुने हे दूषित असल्याचं समोर आलं आहे. त्यामुळे पुणेकरांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

पुणेकर पित आहेत अशुद्ध पाणी! पाणी शुद्ध न करता थेट पोहोचतं घरी
पुणेकर पित आहेत अशुद्ध पाणी! पाणी शुद्ध न करता थेट पोहोचतं घरी

Pune Water News : पुण्यात जीबीएस आजाराने थैमान घातले आहे. पुण्यात सिंहगड रस्ता परिसरात सर्वाधिक जीबीएस बाधित रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे महानगर पालिकेने  पुण्यातील पाणी स्त्रोतांची तपासणी करण्यास सुरुवात केली आहे. यात खासगी पाणी शुद्धिकरण प्रकल्पातील (आरओ प्लॅट) व इतर काही ठिकाणचे पाणी दूषित असल्याचं पुढं आलं आहे. या घटनेमुळे पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणी महापालिका आयुक्तांनी खासगी टँकर व आरओ प्रकल्पांवर थेट कारवाईचे आदेश पालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिले आहेत.

पुण्यात सिंहगड रस्ता नांदेड, किरकटवाडी, नांदोशी, थायरी, डीएसके विश्व, आंबेगाव या परिसरात गुलेन बॅरी सिंड्रोमचे (जीबीएस) रुग्ण मोठ्या प्रमाणात आढळले आहेत. पुण्यात सध्या ११९ जीबीएस बाधित रुग्ण आहेत. यानंतर पालिकेने या परिसरातील पाण्याच्या स्त्रोतांची पाहणी करण्यास सुरुवात केली. खासगी टँकर भरणा केंद्र, खासगी टैंकरमधील पाण्याची तपासणी केल्यानंतर संबंधित पाण्यात ई-कोलाय व अन्य जीवाणू असल्याचे आढळून आले आहे. पालिकेने संबंधित टँकर भरणा केंद्र व खासगी टँकर यांना लेखी सूचना देखील केल्या होत्या. हे पाणी शुद्ध करून त्याचा पुरवठा करण्याचे देखील आवाहन करण्यात आले होते. यासाठी पालिकेतून ब्लिचिंग पावडर नेण्याचे देखील आवाहन करण्यात आले होते. मात्र, विना शुद्धीकरण करून टँकरद्वारे हे पाणी पुरवले जात होते.

तपासणीत आरो प्रकल्पाचे पाणी आढळले दूषित

महापालिकेने खासगी आरो प्रकल्पाचे पाणी देखील तपासले आहेत. यात ३० पैकी तब्बल १९ प्रकल्पांचे पाणी अशुद्ध असल्याचं आढळलं आहे. पालिकेने या घटनेची गांभीर्याने दखल घेतली असून महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी संबंधित खासगी टैंकर, आरओ प्लॅटचानक यांच्यावर कारवाईचे आदेश दिले आहेत.

अनेक जलस्त्रोत दूषित

पुणे महापालिका हद्दीतील १६८ पाणी नमुने राज्य सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविले होते. यात पुण्यातील ८ जलस्रोत दूषित असल्याचे समोर आले आहे. दूषित पाण्यामुळे जीबीएसचे रुग्ण वाढत असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे या आठ जलस्रोतांमधील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचे निष्कर्ष समोर आले आहे, अशी माहिती आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकिसन पवार यांनी दिली आहे. नागरिकांनी पाणी थेट न पिता ते उकळून प्यावे किंवा त्याचे शुद्धीकरण करून ते प्यावे असे आवाहन देखील पालिकेने केले आहे. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर