Zika Viras In Pune : पुण्यात 'झिका'चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू
मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Zika Viras In Pune : पुण्यात 'झिका'चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

Zika Viras In Pune : पुण्यात 'झिका'चा धोका वाढला! चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ, आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू

Updated Jun 29, 2024 05:27 PM IST

Zika Virus : पुण्यात झिका व्हायरसचा प्रसार वाढत असून आज चौथा रुग्ण आढळला आहे. आरोग्य विभागाने परिसरात सर्वेक्षण सुरू केले असून रक्ताचे नमुने प्रयोगशाळेत पाठवले आहे.

पुण्यात झिकाचा चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ
पुण्यात झिकाचा चौथा रुग्ण आढळल्यानं खळबळ

पुण्यात झिका व्हायरस चांगलाच पसरताना दिसत आहे.  मुंढव्यात गुरुवारी झिका विषाणूचा तिसरा रुग्ण आढळल्यानंतर आज त्याच भागात आणखी एक झिका बाधित रुग्ण आढळल्याने शहरात खळबळ माजली आहे. पुण्यात झिकाबाधित रुग्णांची संख्या ४ झाली आहे. 

आरोग्य अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितले की, झिकाच्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींवर पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य आरोग्य विभागाकडून विशेष लक्ष ठेवलं जात आहे. या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

झिकाबाधित रुग्ण आढळलेल्या भागात आरोग्य विभागाकडून सर्वेक्षण सुरू आहे. रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवले आहेत. मात्र अहवालांची प्रतिक्षा आहे, मात्र नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घ्यावी, उपचार वेळेत घेतले तर झिका बरा होऊ शकतो. खासगी रुग्णालयांनीही माहिती लपवू नये, असं आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.

रुग्ण आढळलेल्या एरंडवणा आणि मुंढवा परिसरातील २ हजार ४०० हून अधिक घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. या परिसरामधील नागरिकांना झिका व्हायरसची लक्षणे आहेत की नाही याची तपासणी केली जात आहे. खासगी रुग्णालयांमध्ये झिकाची लक्षणे असलेले रुग्ण आढळले तर त्यांनी याची माहिती न लपवता महापालिकेला कळवावी, असं अधिकारी डॉ. स्मिता सांगडे यांनी सांगितलं.

डेंग्यू आणि चिकनगुनियासारख्या संसर्गाचा प्रसार करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या संक्रमित एडिस डासाच्या चाव्याद्वारे झिका विषाणूचा प्रसार होतो. झिकाची लागण झालेले रुग्णांमध्ये ताप, पुरळ, नेत्रश्लेष्मलाशोथ, अंगदुखी आणि सांधेदुखीची सौम्य लक्षणे दिसतात. महापालिकेने शहरातील अनेक भागात कंटेनर सर्व्हे करून तापाच्या रुग्णांची तपासणी सुरू केली आहे. 

झिकाची लक्षणे - 

झिकाचा व्हायरस एडिस जातीच्या डासांपासून पसरतो. याची लागण झाल्यावर ताप येणे. अंगावर पुरळ येणे. अशक्तपणा, सांधेदुखी, अंगदुखी, डोळे लाल होणे अशी लक्षणे आढळतात. 

झिकाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय -

  • नागरिकांना घराच्या अवतीभोवती पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. 
  • आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस पाळावा.
  • डासांपासून संरक्षण करण्यासाठी मच्छरदानी आणि औषधांचा वापर करावा. पूर्ण अंग झाकतील असे कपडे घालावेत. 
  • गरोदर महिलांनी अधिक काळजी घेण्याची गरज आहे. कारण झिकाची लागण झाली तर प्रिमॅच्युअर डिलिव्हरी आणि जन्मजात दोष निर्माण होण्याची शक्यता असते. 

Whats_app_banner

संबंधित बातम्या

विभाग
महाराष्ट्रातील बातम्या, प्रत्येक घडामोडीची ब्रेकिंग न्यूज मिळवा हिंदुस्तान टाइम्स मराठीवर